महापालिकेची मोहीम : रविवारी १७ धार्मिक स्थळांवर झाली कारवाई९९ अनधिकृत धार्मिक स्थळे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:19 AM2017-11-13T01:19:21+5:302017-11-13T01:20:00+5:30
महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गेल्या बुधवारपासून (दि.८) सुरू केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहिमेत शहरातील एकूण ९९ धार्मिक स्थळे अद्याप हटविण्यात महापालिकेला यश आले आहे.
नाशिक : महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गेल्या बुधवारपासून (दि.८) सुरू केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळ हटाव मोहिमेत शहरातील एकूण ९९ धार्मिक स्थळे अद्याप हटविण्यात महापालिकेला यश आले आहे. मोहिमेच्या पाचव्या दिवशी रविवारी (दि.१२) १७ अतिक्रमणे काढण्यात आली.
वाहतुकीला अडथळा ठरणाºया शहरातील विविध रस्त्यांवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दंगल नियंत्रण पथकासह राज्य राखीव दलाच्या तुकडीचा वाढीव फौजफाटा मोहिमेला पुरविण्यात आला आहे. रविवारी सकाळी मुंबई नाका, उपनगर, इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोहीम राबविली गेली. बजरंगवाडी येथून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मुंबई नाका, उपनगर, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धार्मिक स्थळांवर कारवाई पूर्ण केल्यानंतर महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येणार आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने अतिक्रमण मोहिमेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे.