सोशल मीडियावर ओझर विमानतळ नामांतरासाठी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 01:02 AM2021-07-01T01:02:37+5:302021-07-01T01:04:41+5:30
नाशिकला ओझर मिग कारखाना आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे.
नाशिक : नाशिकला ओझर मिग कारखाना आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे.
आगामी काळात या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी ओझर येथे मिग कारखाना आणण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच नाशिकमध्ये मिग कारखाना आला. त्यामुळे येथील विमानतळाला गायकवाड यांचे नाव देण्यात यावे यासाठी २०१४ पासून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या अगोदरदेखील सातत्याने नामकरणाचा विषय समोर आला आहे. अजूनही हा प्रश्न शासन दरबारी मांडला जातच आहे.
२०१५ मध्ये रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीदेखील या मुद्द्यावर राज्य सरकारकडे मागणी केली होती. ओझरजवळील हा प्रकल्प दादासाहेब गायकवाड यांच्या त्यागातून आणि प्रयत्नातून साकारला असल्याचे त्यावेळी आठवले म्हणाले होते. विमानतळाला गायकवाड यांचे नाव देणेच उचित असल्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर सातत्याने कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरली.
विविध प्रकारांचा आधार
मुंबईतील विमानतळाच्या नामकरणाचा वाद सुरू झाल्यानंतर नाशिकमध्येदेखील ओझर विमानतळाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी सोशल मीडियाचा आधार घेऊन जनमत तयार करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, सह्यांची मोहीम, मानवी साखळी असे उपक्रम करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले जातील.