आठवडाभर प्रचाराचा धुराळा
By admin | Published: February 12, 2017 11:42 PM2017-02-12T23:42:40+5:302017-02-12T23:42:59+5:30
अंतिम टप्पा : नेत्यांच्या सभांचे नियोजन
नाशिक : नाशिक महापालिकेच्या जाहीर निवडणूक प्रचारासाठी अवघे सात दिवस शिल्लक राहिल्याने अखेरच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांना प्रचारासाठी पाचारण करण्याचे ठरविले असून, येत्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण आदिंच्या जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडणार आहे.
महापालिका निवडणुकीतून मंगळवार, दि. ७ रोजी माघार घेण्याची व उमेदवारांना चिन्ह वाटपाची मुदत संपुष्टात आल्यानंतर खऱ्या अर्थाने उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभागातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच लहान-मोठ्या बैठका, मेळाव्यांच्या माध्यमातून उमेदवारांनी आपली ओळख मतदारांसमोर ठेवली. प्रचार पत्रके, पोस्टर्स, बॅनर्स लावून वातावरण निर्मितीला सुरुवात केली, त्याचबरोबर प्रभागातील जवळपास सर्वच मतदारांची भेट घेण्याचा प्रयत्नही उमेदवारांनी पूर्ण केला आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात घरोघरी पोहोचण्यात उमेदवार यशस्वी झाले असले तरी, राजकीय पक्षांकडून उमेदवारी करणाऱ्यांना निवडणूक प्रचारात मतदारांना आपलेसे करण्यासाठी स्टार प्रचारकांची अखेरच्या टप्प्यात असलेली गरज ओळखून सर्वच राजकीय पक्षांनी चालू आठवड्यात जाहीर सभांचे आयोजन केले आहे. त्यासाठी शहर व परिसरातील मोकळी मैदाने राखून ठेवण्यासाठी महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिवसेनेने पहिल्या टप्प्यात पर्यावरणमंत्री रामदास कदम, उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे या दोघांना मैदान तापविण्यासाठी नाशिकला पाठवून वातावरण निर्मिती केली आहे, तर निवडणूक वचननामा जाहीर करण्याच्या निमित्ताने युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील नाशकात दाखल होऊन रोड-शोच्या माध्यमातून ते सैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करणार आहेत. अखेरच्या टप्प्यात थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होऊन ही सभा वातावरण बदलास कारणीभूत ठरेल, असे सेनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. सेनेप्रमाणे भाजपानेही आपल्या स्टार प्रचारकांना येत्या आठवड्यात पाचारण करण्याचे नियोजन सुरू केले आहे.
रविवारी सायंकाळी प्रचाराची सांगता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशकात जाहीर सभा घेण्याचे प्रयत्न केले जात आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची एकमेव सभा होणार आहे. राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक तर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांच्या सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. रविवार, दि. १९ रोजी सायंकाळी पाच वाजता निवडणूक प्रचाराची सांगता होणार असून, तत्पूर्वी प्रचाराचा धुराळा उडवून देण्याचे सर्वांचे प्रयत्न आहेत.