येवला तालुक्यात उमेदवारांचे सोशल मीडियावर रंगले प्रचारयुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 05:59 PM2021-01-11T17:59:40+5:302021-01-11T18:00:05+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील ८९ पैकी ६९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असल्याने उमेदवारांनी आपापल्यापरीने सोशल मीडियावर कामांचा लेखाजोखा मांडून आपणच कसे योग्य उमेदवार आहोत हे पटवून देत प्रचाराचा धुरळा उडविला आहे .
६१ ग्रामपंचायतींचा प्रचार आता चांगलाच रंगात आला असून गावातील प्रमुख पॅनलच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही मतदारांपर्यंत आपल्या चिन्हासह पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. त्यासाठी मोबाइलमधील विविध ॲपच्या साहाय्याने निवडक मराठी, हिंदी गाणी टाकून छोट्या-छोट्या व्हिडीओ क्लिप्स तयार करून त्या व्हायरल केल्या जात आहेत. तथापि, मतदारही सोशल मीडियाचा वापर करीत अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर गावचा सरपंच कसा असावा यासंदर्भात अनेक विनोदी चुटकुले, निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे निवडणूक संदर्भातील कीर्तन तसेच आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे यांचे समाजप्रबोधनपर व्हिडीओ क्लिप्स टाकून उमेदवारांना ऊर्जा देण्यासोबतच त्यांच्याकडून आपल्या अपेक्षांचा संदेशही पोहोचवीत आहेत.