वडाळा-गोपालवाडी रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:53 AM2019-08-20T00:53:18+5:302019-08-20T00:53:37+5:30
वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्रीश्री रविशंकर दिव्य या १०० फुटी रस्त्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोपालवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
नाशिक : वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून गोपालवाडीमार्गे श्रीश्री रविशंकर दिव्य या १०० फुटी रस्त्याला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोपालवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या भागात गटारीचे काम करण्यात आले. त्यानंतर थातुरमातुर पध्दतीने मुरूम टाकण्यात येऊन रस्ता दुरुस्ती के ली गेली, मात्र पावसाळ्यात खडीकरण वाहून गेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
भूमिगत गटारीच्या कामासाठी हा रस्ता तीन महिन्यांपूर्वी मनपाच्या भुयारी गटार विभागाकडून खोदला गेला. त्यानंतर गटारीचे काम आटोपल्यानंतर उखडलेल्या रस्त्याचे खडीकरण कसे तरी संबंधित विभागाकडून केले गेले, मात्र मागील पंधरवड्यापूर्वी झालेल्या जोरदार संततधारेत खडीकरण वाहून गेले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच सर्वत्र गाळ साचला आहे. यामुळे रस्त्यावरून पायी जाणेदेखील शक्य होत नसल्याने या भागातील नागरिकांना रस्ता बदलावा लागत आहे. वाहने येथून मार्गस्थ होताच नादुरुस्त होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनपा प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केला जात आहे. पावसाने उघडीप देऊनदेखील अद्याप वडाळागावातील रस्त्यांची दुरुस्तीकडे लक्ष पुरविले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
वडाळागावात पावसाळापूर्व भूयारी गटारीच्या कामांमुळे रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच रस्ता एका बाजूने पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे त्याचा वापर नागरिकांना करता येणे अशक्य होत आहे. वडाळा चौफुलीपासून थेट पांढरी आई देवी मंदिरापर्यंत वडाळागावाच्या मुख्य रहदारीच्या रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत.
या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचीही दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे मनपा प्रशासनाने माती-मुरूम टाकून खड्डे बुजविण्यापेक्षा थेट डांबरीकरण करण्यावर भर द्यावा, अशी मागणी होत आहे. कारण श्रावणसरींचा वर्षाव अद्यापही सुरू असून पावसाने माती, मुरूम वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरण्यास मदत होईल, असे नागरिकांनी सांगितले.