परीक्षा रद्दच करा; छात्रभारतीची मागणी, सोशल मिडियावर राज्यपाल हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 01:48 PM2020-06-07T13:48:34+5:302020-06-07T13:52:48+5:30
परीक्षांसाठी आग्रही असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधातही छात्रभारतीने सोशल मिडियात मोहीम उघडली आहे. या मोहीमेंतर्गत परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवीताची काळजी कोण घेणार असा सवाल उपस्थीत करीत छात्रभारतीने राज्यपाल हटाव, विद्यार्थी बचाव आंदोलन सुरू केले आहे
नाशिक : महाराष्ट्रासह देशभरातील कोरोना बाधितांची परिस्थिती बघता राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे हाच मार्ग उपलब्ध असल्याचे नमूद करीत संपूर्ण राज्यातील अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे परीक्षांसाठी आग्रही असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधातही छात्रभारतीने सोशल मिडियात मोहीम उघडली आहे. या मोहीमेंतर्गत परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवीताची काळजी कोण घेणार असा सवाल उपस्थीत करीत छात्रभारतीने राज्यपाल हटाव, विद्यार्थी बचाव आंदोलन सुरू केले आहे.
लॉकडाऊनमुळे विद्यार्थी दोन-अडीच महिण्यापासून घरातच बसून आहेत. त्यामुळे विद्यार्थी आधीच मानसिक तणावाखाली असून नैराश्याने ग्रासलेले आहेत. त्यातच राज्यसरकार, राज्यपाल आणि विरोधी पक्षात कलगीतुरा चाललेला असताना अंतीम वर्षाच्या परीक्षांसदर्भात कोणताही ठोस निर्णय होत नाही. सरकारच्या निर्णयाला राज्यपाल व विरोधक आडकाठी घालत असल्याचा आरोप करीत सरकार आणि राज्यपाल यांच्या संघर्षात सामान्य विद्यार्थी कोंडीत सापडल्याचेही छात्रभारतीने नमूद केले आहे.
सध्याची कोरोना विषाणू प्रादुभार्वाची व्यावहारिक परिस्थिती लक्षात घेता परीक्षा रद्द करणे हाच मार्ग दिसत असताना त्यावर राजकारण न करता संपूर्ण विचारांती निर्णय घेण्याची मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील मतभेदांमुळे परीक्षेविषयी निर्णाण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणाविषयी निषेध नोंदविण्यासाठी छात्रभारतीतर्फे सोशल मिडियावर #राज्यपाल हटवा, विद्यार्थी वाचवा. # परीक्षा रद्द झाल्याच पाहिजेत. अशा स्वरुपाच्या घोषणांच्या माध्यमातून मोहीम सुरू केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमत: प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा न घेता केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात, अशी स्पष्ट भूमिका छात्र भारतीने सुरुवातीला घेतली होती, तसे निवेदनही संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. परंतु ज्या पद्धतीने शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत कोरोनाचा फैलाव झाला आहे या परिस्थितीत कोणत्याही पद्धतीने परीक्षेचे आयोजन करणे शक्य नाही. छात्रभारतीने परीक्षा रद्द करण्याची भूमिका घेण्याआगोदर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे मतं जाणून घेतले, यामध्ये परीक्षा न घेण्याबाबतच कल दिसून आला. -प्रा.रविंद्र मेढे - प्रदेशाध्यक्ष, छात्रभारती, महाराष्ट्र.