जिल्हा बॅँकेच्या २३ शाखांच्या विलीनीकरणाचा निर्णय रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:41 AM2018-06-14T01:41:11+5:302018-06-14T01:41:11+5:30
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खर्चात कपात करण्यासाठी बॅँकेच्या ग्रामीण २३ शाखांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्यावर तीव्र पडसाद उमटू लागताच बॅँकेने शाखांचे विलीनीकरणाचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. आता या शाखांचे मजबुतीकरण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी बुधवारी (दि. १३) दिली. नोटाबंदी व कर्जवसुली न झाल्याने जिल्हा बॅँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. बॅँकेची ही स्थिती लक्षात घेऊन बॅँकेचा प्रशासकीय खर्च याचा ताळमेळ घेण्यास सुरु वात केली. अल्प व्यवहार होत असलेल्या तोट्यातील २३ शाखा बंद करण्यात आल्या आहेत. सदरच्या शाखा प्रशासकीय खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, कार्यालयीन खर्च यामुळे या शाखा तोट्यात गेल्याने त्या संचालक मंडळाकडे सदरच्या बॅँक शाखांचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. संचालक मंडळाने २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली होती. या झालेल्या निर्णयानुसार येत्या दि. ३० जूनपर्यंत सदरच्या शाखांचे विलीनीकरण नजीकच्या बॅँक शाखांमध्ये केले जाणार होते. मात्र त्यामुळे शेतकरी सभासदांची गैरसोय होणार असल्याने शाखांचे विलीनीकरण करू नये अशी मागणी शेतकºयांकडून होत होती. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय, शेतकरी सभासद व विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय संचालक मंडळाने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे अध्यक्ष केदा आहेर यांनी सांगितले.