करंजवण योजनेच्या लोकवर्गणीसाठी खल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:57 AM2019-06-21T00:57:51+5:302019-06-21T00:58:17+5:30
मनमाड शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या लोकवर्गणीसाठी नागरिकांच्या सामूहिक सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी व्यक्त केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.
मनमाड : शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या लोकवर्गणीसाठी नागरिकांच्या सामूहिक सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी व्यक्त केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष राजेंद्र अहिरे, प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
पाणीटंचाई पाचविला पूजलेल्या मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासनाकडून करंजवण ते मनमाड थेट पाइपलाइन योजना मंजूर करण्यात आली आहे.
या योजनेसाठी पालिकेला ४५ कोटी रुपयांची लोकवर्गणी भरावयाची असून, यावर चर्चा करण्यासाठी पालिका सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही योजना मंजूर करण्यासाठी सहकार्य लाभलेल्या सर्व लोकप्रतिनिधी, याचिकाकर्ते, मनमाड बचाव समिती, आंदोलनकर्त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील यांनी योजनेची सविस्तर माहिती सांगितली. पालिकेची शहरातील नागरिकांकडे पाणीपट्टी व घरपट्टीची आठ कोटी रुपये थकबाकी असून, ही थकबाकी भरण्याचे आवाहन नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी केले.
गटनेते गणेश धात्रक,
नगरसेवक कैलास पाटील, रवींद्र घोडेस्वार, संगीता पाटील यांनी भाषणातून लोकवर्गणीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.