पारंपरिक 'जुलूस-ए-मुहम्मदी' रद्द; धर्मगुरुंच्या पाच वाहनांना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 04:50 PM2021-10-18T16:50:06+5:302021-10-18T16:54:43+5:30
सोमवारी (दि.१८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या शिष्टमंडळाने पाण्डेय यांची भेट घेतली. या भेटीत साधकबाधक चर्चा करण्यात आली. शासनाच्या अटी-शर्तींचे पालन करत शांततेत ईद-ए-मिलादचा सण साजरा करावा असे आवाहन पाण्डेय यांनी यावेळी केले.
नाशिक : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) मंगळवारी (दि.१८) सर्वत्र साजरा केला जात आहे. शासनाच्या सुचनांप्रमाणे शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सोमवारी शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. पारंपरिक जुलूस मार्गावर केवळ धर्मगुरुंच्या पाच वाहनांना मार्गस्थ होण्याची परवानगी दिली. समाजबांधवांनी 'जुलूस'मध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन शहर-ए-खतीब व पाण्डेय यांनी केले आहे.
दरवर्षी ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते; मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे पारंपरिक मिरवणूकदेखील रद्द करण्यात येत आहे. यावर्षी कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याने धार्मिकस्थळेही खुली करण्यात आली आहेत .तसेच शासनाच्या गृह विभागाने पैगंबर जयंतीच्या पार्श्वभुमीवर शनिवारी मार्गदर्शक सुचना जारी केल्या. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी खतीब यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेत चर्चा केली. सशर्त केवळ पाच प्रमुख वाहनांना मिरवणूक मार्गाने रवाना होण्याची परवानगी त्यांनी दिली आहे.
सोमवारी (दि.१८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या शिष्टमंडळाने पाण्डेय यांची भेट घेतली. या भेटीत साधकबाधक चर्चा करण्यात आली. शासनाच्या अटी-शर्तींचे पालन करत शांततेत ईद-ए-मिलादचा सण साजरा करावा असे आवाहन पाण्डेय यांनी यावेळी केले. याप्रसंगी हाजी युनुस रजवी, सलीम हैदर पटेल, हाजी निजाम कोकणी, अकरम खतीब, हाजी जाकिर अन्सारी आदि उपस्थित होते.
केवळ प्रतिकात्मक शासनाच्या आदेशाप्रमाणे या पाच वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी सहभागी होऊ नये. जे धर्मगुरु सहभागी होणार आहेत, त्यांच्या नावांची यादीही आयुक्तालयाला सोपविण्यात आली आहे.
शहरातील प्रमुख मशिदींचे धर्मगुरु, उलेमांच्या उपस्थितीत केवळ पाच वाहने पारंपरिक जुलूस मार्गावरुन दुपारी ३वाजता मार्गस्थ होतील. कोठेही ही वाहने न थांबता थेट बडी दर्गामध्ये पोहचणार आहे. शहर व परिसरात कोठेही कोणीही विनापरवानगी जुलूस काढू नये. समाजबांधवांनी मशिदींमध्ये होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा.
- हाफीज हिसामुद्दीन अशरफी, शहर-ए-खतीब