बुद्धपौर्णिमेला होणारी वन्यप्राणी गणना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 10:18 PM2020-05-06T22:18:46+5:302020-05-07T00:01:27+5:30
नाशिक : बुध्दपौर्णिमेच्या चांदण्यारात्री लख्ख प्रकाशात दरवर्षी वन, वन्यजीव विभागाकडून अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात करण्यात येणारी वन्यप्राणी गणना यावर्षी स्थगित करण्याचा निर्णय राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा विभागीय वनाधिकारी एस.बी. भलावी यांनी जाहीर केला आहे.
नाशिक : बुध्दपौर्णिमेच्या चांदण्यारात्री लख्ख प्रकाशात दरवर्षी वन, वन्यजीव विभागाकडून अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात करण्यात येणारी वन्यप्राणी गणना यावर्षी स्थगित करण्याचा निर्णय राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा विभागीय वनाधिकारी एस.बी. भलावी यांनी जाहीर केला आहे. याबाबतचे पत्र अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांसह सर्व व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, तथा विविध जिल्ह्यांचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांना पाठविण्यात आले आहे. यामुळे यंदा राज्यभरात कोठेही कोणत्याही प्रजातीच्या वन्यप्राण्यांची गणना होऊ शकणार नाही. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय वन्यजीव विभागाकडून घेण्यात आला आहे.बुध्दपौर्णिमेला वार्षिक वन्यप्राणी गणना राज्यभरात वन्यजीव विभागासह वनविभागाकडून (प्रादेशिक) केली जाते. यावर्षी मात्र कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे परस्परांमधील ‘डिस्टन्स’ राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. परिणामी वन्यप्राणी गणनेदरम्यान एका टॉवरवर एकापेक्षा अधिक निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमींची संख्या असते. त्यामुळे कोरोना आजाराच्या फैलावाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोरोना आजारामुळे विविध जिल्ह्यांच्या सीमाबंदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामधील अभयारण्यांमध्ये निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी अभ्यासक पोहचू शकणार नाही, अशा सर्व बाबी लक्षात घेता यंदाची बुध्दपौर्णिमेला होणारी वार्षिक वन्यप्राणी गणना स्थगित करण्यात आल्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी जाहीर केले आहे. बुध्दपौर्णिमेला चांदण्या रात्रीचा प्रकाश हा अन्य पौर्णिमेच्या रात्रींपेक्षा अधिक प्रखर असतो. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पाणस्थळे, अभयारण्यांमधील पाणवठ्यांवर तृष्णा भागविण्यासाठी येणारे वन्यप्राणी सहज टिपता येणे शक्य होते. कुठल्या प्रजातीचे वन्यजीव रात्रीतून पाणवठ्यांजवळ किंवा निरीक्षण मनोरे अथवा मचाणजवळून मार्गस्थ झाले तेदेखील सहजरीत्या नजरेस पडते. यासाठी कुठल्याही प्रकारे कृत्रिम प्रकाशयोजनेची आवश्यकता भासत नाही. तसेच चांदण्या रात्रीचा प्रकाश नैसर्गिक असल्यामुळे वन्यजीवदेखील फारसे या प्रकाशाला घाबरत नाही. त्यामुळे दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वार्षिक वन्यप्राणी गणना बुध्दपौर्णिमेला आयोजित केली जाते.
---------
वन्यप्राणी संवर्धनाबाबत होणार संभ्रम
कोरोना आजारामुळे स्थगित करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या वार्षिक प्रगणनेमुळे वन्यजिवांच्या विविध जिल्ह्यांमधील राखीव वनक्षेत्रे, अभयारण्यांमध्ये संवर्धनाबाबत आवश्यक उपाययोजनांबाबत संभ्रम निर्माण होणार आहे. कारण जिल्ह्यांच्या संबंधित वन्यजीव विभागाकडे यावर्षी कुठल्या प्रजातीच्या वन्यप्राण्यांची संख्या वाढली किंंवा घटली याबाबत तशी आकडेवारीच उपलब्ध राहणार नाही. यामुळे वन्यजिवांच्या संवर्धनासाठी कशाप्रकारच्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे, याविषयीचा संभ्रम वाढेल, असे मत वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त होत आहे. कोरोना आजाराचा फैलाव येत्या जून महिन्यापर्यंत नियंत्रणात आल्यास राज्याच्या वन व वन्यजीव विभागासाठी ५ जून जागतिक पर्यावरण दिन आणि त्याच दिवशी येणारी वटपौर्णिमेचा दुग्धशर्करा योग ठरेल. कारण बुध्दपौर्णिमेच्या चांदण्यारात्रीपेक्षा काहीसा कमी जरी चंद्रप्रकाश असला तरी वटपौर्णिमेच्या रात्री राज्यभरात वन्यप्राण्यांची गणना करण्याबाबतचा विचार वन्यजीव विभागाकडून केला जाऊ शकतो. जेणेकरून वन्यप्राण्यांच्या प्रजातींचा अधिवासाबाबतचा निष्कर्ष काढणे अधिक सोपे होईल, असे निसर्गप्रेमी व वन्यजीवप्रेमींनी म्हटले आहे.