उमेदवार सेनेचे नव्हे अखेर अपक्षच
By Admin | Published: February 7, 2017 12:39 AM2017-02-07T00:39:31+5:302017-02-07T00:39:48+5:30
प्रभाग ३० : शिवसेनेवर नामुष्की; दावा फेटाळला
इंदिरानगर : प्रभाग क्रमांक ३० मधून शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे एबी अर्ज अखेर बाद ठरवत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या उमेदवारांना शिवसेना पुरस्कृत नव्हे तर अपक्ष उमेदवार म्हणूनच घोषित केल्याने सेनेला या प्रभागात अधिकृत उमेदवार लाभले नाही. येथील उमेदवारांना पक्षाचे अधिकृत पुरस्कृत म्हणून जाहीर करावे, यासाठी शिवसेनेकडून करण्यात आलेले प्रयत्न फोल ठरले. पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक ३० मधून शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेले संजय चव्हाण, रशिदा शेख, शकुंतला खोडे आणि नीलेश चव्हाण यांनी एबी अर्जाची झेरॉक्स जोडल्याने त्यांचे अर्ज गेल्या शनिवारीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून ग्राह्य धरले जातील, असे जाहीर केले होते. परंतु संजय चव्हाण यांनी बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंतची मदत मागून घेतली होती. अधिकाऱ्यांपुढे आज संजय चव्हाण आणि भाजपाचे सतीश सोनवणे यांच्या वकिलांनी बाजू मांडली.
महापालिका निवडणुकीसाठी प्राप्त उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन प्रभाग क्रमांक ३० मध्ये अनुसूचितसाठी नीलेश चव्हाण, ओबीसी महिला प्रवर्गातून शकुंतला खोडे, सर्वसाधारण महिला गटातून विद्यमान नगरसेवक रशिदा शेख आणि सर्वसाधारण जागेसाठी संजय चव्हाण यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र या चौघांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताना एबी अर्जाची झेरॉक्स प्रत जोडली होती. शिवाय त्यांच्या एबी अर्जावरील शिक्का निळा नसल्याने तसेच स्वाक्षरीदेखील काळ्या शाहीने करण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या चारही उमेदवारांना पक्ष चिन्हावर निवडणूक लढवता येणार नसल्याचा निकाल देत त्यांची उमेदवारी अपक्ष म्हणूनजाहीर केली होती. यावेळी संजय चव्हाण यांच्या वकिलांनी बाजू मांडण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत मागितली होती. त्यानुसार आज या प्रकरणावर सुनावणी झाली. सकाळी ११ वाजता पूर्व विभागीय निवडणूक कार्यालयात संजय चव्हाण आणि भाजपाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या वकिलांनी सुमारे पाऊणतास युक्तिवाद केला. त्यानुसार एबी अर्जाच्या झेरॉक्सवरून तसेच त्याच प्रभागातील इतर तिघांप्रमाणे चव्हाण यांनाही नियम लावण्यात यावा, असा युक्तिवाद सोनवणे यांच्या वकिलांनी केला.