मालेगाव-बागलाणवर उमेदवारांची मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:48 AM2019-03-22T01:48:09+5:302019-03-22T01:49:37+5:30
धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव आणि बागलाण तालुका जोडलेले असल्याने आणि या दोन्ही तालुक्यातील मतदान आजवर निर्णायक ठरत आले असल्याने सर्वच उमेदवारांची भिस्त बागलाण, मालेगाववर अवलंबून असते. त्यात मालेगाव मध्य हा परंपरागत कॉँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने याठिकाणी भाजपाची कसोटी लागत आलेली आहे, तर बागलाण मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपात काट्याची टक्कर होत असल्याचा इतिहास आहे.
मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव आणि बागलाण तालुका जोडलेले असल्याने आणि या दोन्ही तालुक्यातील मतदान आजवर निर्णायक ठरत आले असल्याने सर्वच उमेदवारांची भिस्त बागलाण, मालेगाववर अवलंबून असते. त्यात मालेगाव मध्य हा परंपरागत कॉँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने याठिकाणी भाजपाची कसोटी लागत आलेली आहे, तर बागलाण मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपात काट्याची टक्कर होत असल्याचा इतिहास आहे.
बागलाण आणि मालेगाव दोन्ही तालुक्यातून मिळून आठ लाख ८६ हजार ९२ इतके म्हणजेच जवळपास नऊ लाखांपर्यंत मतदान असल्याने सर्वच उमेदवारांचे लक्ष मालेगाव आणि बागलाण तालुक्याकडे लागून असते. धुळे लोकसभा मतदारसंघात २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाचे डॉ. सुभाष भामरे विजयी झाले होते. त्यांना पाच लाख २९ हजार ४५० मते (५३.८६ टक्के) इतकी मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले कॉँग्रेसचे अमरिश पटेल यांना तीन लाख ९८ हजार ७३७ मते ( ३८.१९ टक्के) मिळाली होती. त्याखालोखाल बसपाचे योगेश यशवंत येशी यांना नऊ हजार ८९७ (९.२९ टक्के) तर आम आदमी पक्षाचे उमेदवार निहाल अन्सारी यांना नऊ हजार ३३९ (९.२९ टक्के) इतकी मते मिळाली होती.
मालेगाव मध्य मतदारसंघात भाजपाचे डॉ. सुभाष भामरे यांना पाच हजार ७८६, तर मालेगाव बाह्यमध्ये एक लाख १२ हजार ५६३ इतकी मते मिळाली होती. बागलाण तालुक्यात ८६ हजार ७७ इतकी मते त्यांनी घेतली होती. कॉँग्रेसचे उमेदवार अमरिश पटेल यांना मालेगाव मध्यमध्ये एक लाख ३३ हजार १२४ मते मिळाली होती, तर मालेगाव बाह्यमध्ये ४३ हजार ७६ मते मिळाली होती. बागलाणमध्ये ७२ हजार ४६३ मतांचे दान त्यांच्या पदरात पडले होते. म्हणजेच भाजपाच्या विरोधात मालेगाव मध्यमध्ये कॉँग्रेस उमेदवार अमरिश पटेल यांना डॉ. भामरे यांच्यापेक्षा एक लाख २८ हजार मतांची आघाडी मिळाली होती. मालेगाव बाह्यमध्ये मात्र त्या उलट परिस्थिती होती. मालेगाव बाह्यमध्ये डॉ. सुभाष भामरे यांना एक लाख १२ हजार ५६३ इतकी मते मिळाली होती, तर कॉँग्रेसचे अमरिश पटेल यांना ४३ हजार ७६ मते मिळाली होती. म्हणजेच मालेगाव बाह्य मतदारसंघात भाजपाचे डॉ. सुभाष भामरे यांना सुमारे ६९ हजार ७६ मते अधिक मिळाली होती. त्यावेळी मोदी लाट असूूनही अमरिश पटेल यांनी तुल्यबळ लढत दिली होती. बागलाण तालुक्यात भाजपाचे सुभाष भामरे यांना ८६ हजार ७७ मते, तर कॉँग्रेसचे अमरिश पटेल यांना ७२ हजार ७६ मते मिळाली होती म्हणजेच बागलाण तालुक्यातून पटेल यांच्यापेक्षा भामरे यांना १३ हजार ६१४ मते अधिक मिळाली होती. त्यामुळे बागलाण आणि मालेगाव तालुक्यातील मतदारांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
भामरेंकडून मनोमीलनाचा प्रयत्न
मालेगाव शहरातील काही गट-तट डॉ. भामरे यांच्याशी नाराज असल्याचे बोलले जाते. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे डॉ. सुभाष भामरे यांनी गुरुवारी (दि. २१) शिवसेनेचे आमदार आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन मनोमीलन करण्याचा प्रयत्न केला आहे. मालेगावात माजी आमदार आणि विद्यमान महापौर शेख रशीद यांनी धुळे लोकसभा मतदारसंघात मुस्लीम उमेदवार देण्याची मागणी केलेली होती. त्यामुळे मालेगाव मध्य मतदारसंघातील राजकीय भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.