उमेदवार, समर्थक आकडेमोडीत दंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:23 AM2019-10-22T00:23:40+5:302019-10-22T00:24:57+5:30
Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून जय-पराजयाची गणिते मांडण्यास सुरुवात केली असली तरी, निवडणुकीचे खरे चित्र गुरुवारी (दि. २४) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी बूथनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून जय-पराजयाची गणिते मांडण्यास सुरुवात केली असली तरी, निवडणुकीचे खरे चित्र गुरुवारी (दि. २४) मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. तथापि, झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरूनच काहींनी हमखास विजयाचा दावाही करण्यास सुरुवात केली आहे.
अतिशय चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात बदललेली राजकीय समीकरणे व आरोप-प्रत्यारोपांमुळे रंगत निर्माण झाली होती. उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराच्या काळात सर्वशक्तीपणाला लावत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सोमवारी मतदानाच्या दिवशी मतदानासाठी मतदार राजाने बाहेर पडावे यासाठी प्रयत्नही करण्यात आले. प्रत्येक उमेदवाराने जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी सकाळपासूनच आपापल्या हक्काच्या मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त केले. दुपारी मतदानाचा वेग कमी झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची माहिती घेतली व कोणत्या भागातील मतदारांनी मतदान केले नाही त्यांचा शोध सुरू झाला. साधारणत: साडेचार वाजेनंतर उमेदवारांची घालमेल वाढली व मतदान कक्षात असलेल्या प्रतिनिधींकडून एकूण मतदानाची माहिती घेऊन शिल्लक राहिलेल्या मतदारांना आणण्यासाठी वाहने पाठविण्यात आली. सायंकाळी सहा वाजता मतदान आटोपल्यानंतर मात्र उमेदवारांच्या संपर्क कार्यालयावर मतदान प्रतिनिधी व बूथवरील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आपापल्या मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी सादर करून त्यावरून ठोकताळे मांडण्यात आले.
विविध ठिकाणची माहिती केली गोळा
या निवडणुकीत कोणत्या भागातील मतदारांची मते कोणत्या उमेदवाराकडे वळाली असतील, असा अंदाजही वर्तविण्यात येऊन आपल्याला कोठून कमी-अधिक मतदान झाले असेल त्याची माहितीही गोळा करण्यात
आली.
मतदारसंघात कमी झालेल्या मतदानाचा फायदा-तोटा कोणाला यावरूनही उमेदवारांनी आपापल्या विजयाचे आडाखे बांधले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अद्याप तीन दिवस शिल्लक असून, तोपर्यंत सर्वच उमेदवारांची धाकधूक कायम राहणार आहे. निवडणूक निकालानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.