केनिंगस्टन क्लबने फेटाळली मनपाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:34 AM2018-07-01T01:34:13+5:302018-07-01T01:34:26+5:30
: गंगापूररोडवरील केनिंगस्टन क्लबने महापालिकेने बजावलेली एक कोटी ४८ लाख रुपयांच्या भरपाईच्या नोटिसीतील आरोप फेटाळला असून, त्यातील आरोपांचा इन्कार करताना भरपाईची मागणीच बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.
नाशिक : गंगापूररोडवरील केनिंगस्टन क्लबने महापालिकेने बजावलेली एक कोटी ४८ लाख रुपयांच्या भरपाईच्या नोटिसीतील आरोप फेटाळला असून, त्यातील आरोपांचा इन्कार करताना भरपाईची मागणीच बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. न्यायप्रविष्ट प्रकरण असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या या नोटिसीतील अनेक मुद्दे हे कायद्याला धरून तर नाहीच शिवाय नदीपात्रातील गॅबियन वॉलचे नुकसान केले नाही व तसा पुरावा न सादर करताच महापालिकेने भरपाईची मागणी कशी केली? असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे. माजी महापौर प्रकाश मते व त्यांचे पुत्र तथा राष्टÑवादीचे माजी नगरसेवक यांच्या ग्रीन फिल्ड लॉन्सवरून हा संघर्ष सुरू झाला आहे. ग्रीन फिल्ड प्रकरणात महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना उच्च न्यायालयात माफिनामा सादर करावा लागला होता. त्यानंतर महापालिकेने मते यांच्याच मालकीच्या केनिंगस्टन क्लबला नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. या क्लबच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे गोदापात्रात महापालिकेने बांधलेली गॅबियन वॉल खचल्याने त्याच्या भरपाईपोटी क्लब संचालकांनी १ कोटी ४८ लाख रुपयांची भरपाई द्यावी तसेच गोदापात्रात असलेला क्लबच्या बांधकामाचा मलबा हटवावा यांसह विविध प्रकारचे आदेश २८ जून रोजीच्या नोटिसीत दिले होते. सदरची भरपाईची रक्कम ४८ तासांत देण्याचे आदेशदेखील देण्यात आले होते. त्यामुळे क्लबचे संचालक काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून होते. परंतु क्लबचे संचालक विक्रांत प्रकाश मते यांनी रक्कम न भरता आयुक्तांना रीतसर कायदेशीर पत्राने प्रत्युत्तर दिले असून, त्यात महापालिकेचे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत.
महापालिकेने ज्या गॅबियन वॉलचे क्लबच्या बांधकामामुळे नुकसान झाले, असा दावा केला आहे. ती भिंत २०१६ मध्ये गोदावरी नदीस आलेल्या महापुरामुळेच वाहून गेली. सदरचे कृत्य नैसर्गिक आपत्तीमुळे घडली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी सर्व्हे नंबर ५५ मध्ये चांदशी शिवारात कोणत्याही प्रकारची आरसीसी रिटेनिंग वॉल अस्तित्वात नव्हती. सदरची घटना घडल्यानंतर आपण मनपाला जागेचा स्ट्रक्चरल इन्स्पेक्शनचा अहवाल व छायाचित्र २३ आॅक्टोबर २०१७ रोजीच पाठविले होते ते महापालिकेला ३० आॅक्टोबर रोजी मिळाले होते. परंतु त्यावर महापालिकेने कोणतीही कार्यवाही केली नव्हती. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे महापालिकेने एक कोटी ४८ लाख रुपयांची भरपाई ४८ तासांत भरण्याचे नोटिसीत नमूद केले असले तरी हे आदेश कोणत्या कायद्याच्या व कलमाखाली घेतले आहेत, हे स्पष्ट होत नाही. तसेच क्लबमुळे गॅबियन वॉलचे नुकसान झाल्याच्या कथित आरोपांचा विचार केला, तर क्लबमुळे हे नुकसान कसे काय झाले हे सिद्ध होत नाही. नाशिक मनपा आणि जिल्हा आपत्कालीन समिती या अर्धन्यायिक संस्था असल्या तरी त्यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता हा निर्णय कसा काय घेतला याचा बोध होत नसल्याचेदेखील मते यांनी पत्रात नमूद केले आहे.
मलबा हटविला, पण...
क्लबच्या संचालकांनी महापालिकेच्या निर्देशानुसार नदीपात्रात पडलेला मलबा काढून घेतला असून, तसे पत्रही या पत्रासोबत जोडले आहे. मात्र क्लबच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच्या डिझाइन शहर अभियंत्याकडे मंजूर करून घ्यावा तसेच बफलर झोनमध्ये केलेले बांधकाम हटवून घ्यावे या मागण्याबाबतदेखील शंका उपस्थित केल्या आहेत. मुळात महापालिकेच्या विरोधात न्यायप्रविष्ट प्रकरण असताना अशाप्रकारच्या नोटिसा देण्याबाबतदेखील क्लबचालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.