कर्णकर्कश हॉर्न पोलिसांना ऐकू येत नाही का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:28+5:302021-06-25T04:12:28+5:30
एरवी तरुण वाहनचालकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्णकर्कश हॉर्न वाहनांना बसविण्याची क्रेझ पहावयास मिळत होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून ही क्रेझ ...
एरवी तरुण वाहनचालकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्णकर्कश हॉर्न वाहनांना बसविण्याची क्रेझ पहावयास मिळत होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून ही क्रेझ आता मागे पडल्याची शंका निर्माण झाली आहे. कारण कर्णकर्कश हॉर्न आता शहर वाहतूक पोलिसांच्या कानावर मागील पाच महिन्यांत एकदाही पडला नसल्याचे ‘शून्य’ कारवाईवरून दिसते. हॉन्किंगप्रकरणी पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचे दुचाकींसह चारचाकींनाचा कर्णकर्कश हॉर्न लावण्याकडे कल वाढतच चालला आहे. मात्र, शहर वाहतूक पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने जणू ‘कानावर हात’ ठेवल्याने कर्णकर्कश हॉर्नचा दणदणाट शहरात वाढत असल्याची तक्रारींमध्ये वाढ होत आहे.
-इन्फो-
‘फॅन्सी हॉर्न’ची फॅशन
म्युझिकल फॅन्सी हॉर्नचा मोह अजूनही काही बेशिस्त वाहनचालकांना आवरता येत नसल्याचे दिसून येत आहे. अशा ३१ बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत एकूण १३ हजार रुपयांचा दंड या पाच महिन्यांत केला आहे. यापैकी केवळ तीन हजार रुपयांचा दंड अद्याप वसूल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या हॉर्नमुळेसुद्धा इतर वाहनचालकांचा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---इन्फो--
‘नो-हॉर्न डे’चा पडला विसर
शहरात मागील पाच महिन्यांत एकाही वाहनचालकाकडून कर्णकर्कश हॉर्नचा वापर केला गेला नाही हे शहर वाहतूक शाखेच्या ‘हॉन्किंग’अंतर्गत कारवाईच्या रकान्यातील शून्यावरून दिसते; मात्र शहरातील वाहतुकीची वस्तुस्थिती काही वेगळेच चित्र दाखविते. शहर पोलिसांनी एकेकाळी नागरिकांमध्ये ‘नो हॉर्न डे’ अशी संकल्पना विशेष अभियानाद्वारे रुजविण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस अधिकारी बदलताच हा जनप्रबोधनात्मक उपक्रम बासनात गुंडाळला गेला.
---इन्फो--
कर्णकर्कश हॉर्न वाजविला तर..
कर्णकर्कश हॉर्नचा वापर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारा ठरतो. मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७नुसार संबंधित वाहनचालक दंडात्मक कारवाईसाठी पात्र ठरतो. त्यास पाचशे ते हजार रुपयांपर्यंत दंड वाहतूक पोलिसांकडून केला जाऊ शकतो, तर आरटीओकडून सदर हॉर्न काढून घेत जप्त केला जाऊ शकतो.
विविध आवाजाची धून असणारे (जनावरांचे आवाज, मुलाच्या रडण्याचे आवाज, रिव्हर्स हॉर्न) हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. कर्णकर्कश चायनामेड प्रेशर हॉर्न आजही शहरातील विविध मालवाहू वाहनांना बसविल्याचे दिसून येते. मात्र, याकडे आरटीओचे आणि वाहतूक शाखेचेही समांतर दुर्लक्ष होत आहे.
---इन्फो---
कर्कश हॉर्नमुळे बहिरेपणाचा धोका
कर्कश हॉर्न कानाला मोठी हानी पोहोचवू शकतात, कारण मनुष्याचे कान केवळ ६५ डेसिबलपर्यंतचे आवाज सहन करू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले असताना जेव्हा हॉर्न विनाकारण वाजू लागतात तेव्हा बहुतांश दुचाकीचालकांचा पारा चढतो. काही दुचाकीचालक हे त्या वाहनचालकाकडे रागाने बघत डोळेही वटारतात, असे चित्र नजरेस सहज पडते. यावरून हॉर्नचा गोंगाट हा मानसिक स्वास्थ्य बिघडविणारा ठरतो, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मृणाल भारद्वाज यांनी सांगितले. हॉर्नचा कानावर विपरीत परिणाम होऊन कालांतराने बहिरेपणदेखील येऊ शकते, असे कान, नाक, घसा तज्ज्ञ सांगतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी हॉर्नच्या गोंगाटामुळे दीड कोटी निरोगी लोकांच्या आयुष्यावर परिणाम झालेला दिसतो. कर्कश हॉर्न ऐकणाऱ्यांच्या कानांच्या आतमध्ये इजा होऊन कालांतराने बहिरेपण येऊ शकते. यासाठी लोकांनीही विनाकारण हॉर्न वाजवायला हवा. मुळात हॉर्न न वाजवतासुद्धा वाहने व्यवस्थित चालविता येऊ शकतात.
===Photopath===
240621\24nsk_57_24062021_13.jpg
===Caption===
स्टार डमी