कपाटकोंडी कायम, बाल्कनीची अडचण
By admin | Published: February 9, 2017 12:50 AM2017-02-09T00:50:34+5:302017-02-09T00:50:54+5:30
बांधकाम नियमावली सोशल मीडियावर : गावठाणातील चटई क्षेत्रात घट
नाशिक : शहरासाठी बहुचर्चित बांधकाम नियंत्रण व विकसन नियमावली मंजूर झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात शहरातील बहुचर्चित वादग्रस्त कपाटाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या नियमावलीनुसार ९ मीटर रुंदीपेक्षा कमी रुंदी असेल अशा ठिकाणी टीडीआर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे गावठाण भागात रस्ता रुंदीच्या निकषावरच चटई क्षेत्र वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे गावठाणमध्ये सध्या दुप्पट मिळत असलेले चटई क्षेत्र रस्त्याच्या निकषावर कमी करण्यात आले आहे.
सुमारे वर्षभरापासून रखडलेला विकास आराखडा महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत मंजूर झाला असला तरी बांधकाम विकास नियंत्रण नियमावली मात्र मंजूर होत नव्हती. आता ही नियमावली मंजूर झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विनास्वाक्षरी असलेली ही नियमावली मंजूर करण्यात आल्याचे काही विकासकांनी स्पष्ट केले आहे. अर्थात,आयुक्तांनी त्यास दुजोरा दिलेला नाही. आपल्याकडे मंजुरीची प्रत आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
व्हायरल झालेल्या या २०६ पानांच्या नियमावलीत नाशिककरांचा कपाटाचा प्रश्न सुटलेला नाही. संपूर्ण नियमावलीत दोन ठिकाणी कबर्ड या शब्दाचा वापर झालेला आहे, परंतु त्यात नाशिकच्या बहुचर्चित समस्याची तड लागली नसल्याचे विकासकांचे म्हणणे आहे. उलट बाल्कनीसाठी १५ टक्के परवानगी आहे. मात्र, त्यासाठी तीन मीटर मार्जिनल स्पेस असणे आवश्यक आहे. बाल्कनी बंद करून घेण्यास यापूर्वी असलेली तरतूद रद्द करण्यात आली असून त्यामुळे कपाट कोंडी कायम असून बाल्कनीची नवीन समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.