नाशिकमध्ये विक्री करणाऱ्या दोघांकडून पाच पिस्तुलांसह २२ जीवंत काडतूसे हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 02:28 PM2018-04-24T14:28:44+5:302018-04-24T14:28:44+5:30
शहरातील वेगवेगळ्या भागात सर्रासपणे गावठी पिस्तुलांसह जीवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.
नाशिक : शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. गुन्हे शोध पथकानेही ठिकठिकाणी गुप्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करुन सापळे रचले. शहरातील वेगवेगळ्या भागात सर्रासपणे गावठी पिस्तुलांसह जीवंत काडतुसांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.
शहरातील अंबड व नाशिकरोड परिसरात दोघा संशयितांकडून प्रत्येकी तीन व दोन असे एकूण पाच पिस्तुलांसह २२ जीवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिटचे पथक रात्री गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस नाईक संजय गामणे यांनी सत्कारपॉइंट नाशिकरोड येथे सापळा रचला. त्याठिकाणी एक व्यक्ती पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुमार चौधरी यांना माहिती दिली. उपनिरिक्षक भीमराव गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी सापळा रचला. माहितीनुसार वरील ठिकाणी संशयित इसम संग्राम बिंदुमाधव फडके (३९, रा.गंधर्वनगरी) हा संशयास्पद हालचाली करताना आढळला. पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी फडके यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला दोन्ही बाजूने पॅँटच्या बेल्टमध्ये दोन पिस्तुल खोसलेले पोलिसांना आढळले. तसेच त्याच्याकडून ११ जीवंत काडतुसेही पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
दुस-या घटनेत अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पिस्तुल विक्री करणा-या एका इसमास अटक केली. त्याच्याकडून १ लाख ९ हजार २५० रुपये किंमतीचे तीन गावठी पिस्तुलांसह ११ जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाला संबंधित चुंचाळे शिवारास सापळा रचण्याच्या सुचना दिल्या. यावेळी एका एक्सयुव्ही मोटार संशयास्पदरित्या पथकाला आढळली. त्यामध्ये बसलेल्या इसमांकडून संशयास्पद वस्तूची देवाणघेवाण होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी मोटारीला घेरले. पोलिसांनी मोटारीमधून चौकशीसाठी ताब्यात घेतलेला मनोज मच्छिंद्र शार्दुल (२५,रा.चुंचाळे) याची कसून चौकशी करत अंगझडती घेतली. दरम्यान, मोटारची झडती घेतली असता मोटारीत दोन पिस्तुलांसह जीवंत काडतुसे पोलिसांना आढळली. तसेच संशयित शार्दुलच्या घराची पोलिसांनी झडती घेत धारधार लांब स्टीलचे पाते असलेला चाकू, अकरा लाख रुपयांची महिंद्र एक्सयुव्ही मोटार, दहा हजाराचा मोबाईल असा एकूण १२ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.