पाथरे शिवारातून पिस्तुलाचा धाक दाखवून लांबवलेली कार हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:24 PM2019-01-16T17:24:33+5:302019-01-16T17:25:01+5:30
शिर्डी - शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जायचे सांगून नाशिक येथून भाडे तत्वावर कार ठरवणाऱ्या चोरट्यांनी गेल्या महिन्यात सिन्नर तालुक्यातील पाथरे शिवारात चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लांबवलेली स्विफ्ट डिझायर कार पुणे जिल्ह्यातील चाकण पोलिसांनी हस्तगत केली आहे.
सदर कारच्या मदतीने गुन्हा करून पळणाºया तिघा संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या राजगुरूनगर येथील जेल तोडून पाळलेला अट्टल गुन्हेगार असल्याचे समजते. गेल्या महिन्यात (दि. १७) डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजता नाशिकच्या द्वारका तेथून तिघा तरूणांनी शिंगणापूरला जाण्यासाठी ‘ओला’ या कंपनीची कार आॅनलाईन बुक केली होती. मात्र त्यांना पिकअप करण्यासाठी द्वारका परिसरात तात्काळ कार उपलब्ध न झाल्याने ओला कंपनीने अन्य कार सर्विसेस मार्फत (एम. एच. १५ ई.ई. ०९०२) या क्रमांकाची मारूती स्विफ्ट डिझायर कार सदर प्रवाशांना पिकअप करण्यासाठी पाठवण्यात आली होती. एजाज अफजल पटेल (२८) रा. कॅनॉल रोड, जेलरोड ( नाशिकरोड ) हा चालक कारमध्ये या तिघा प्रवाशांना घेऊन शनिशिंगणापूरकडे निघाला असताना पाथरे गावाच्या लगत असणाºया सायाळे रस्त्यावर या तिघांनी कार नेण्यास सांगितले. चालकाने विरोध केल्यावर एकाने त्याच्या डोक्याला पिस्तूल सदृश्य हत्यार लावले. महामार्गापासून अर्धा किलोमीटर आत गेल्यावर चालक एजाज यांच्या जवळील मोबाईल फोन, खिशातील कागदपत्रे व १७०० रु पये रक्कम काढून घेऊन त्याला रस्त्याच्या कडेला असणाºया नालीत ढकलून देण्यात आले. तेथून कार पुन्हा महामार्गाकडे नेत हे तिघे प्रवासी पसार झाले होते. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात कारचा चालक एजाज याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर कार व तिघा संशयितांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कार चोरीचा गुन्हा वावी पोलीस ठाण्यात दाखल आहे.