बिबट्या पिंजऱ्यात कैद
By Admin | Published: October 28, 2016 11:45 PM2016-10-28T23:45:41+5:302016-10-28T23:46:11+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यात दीड वर्षात पकडले १४ बिबटे; १५ ठिकाणी पिंजरे
निफाड : तालुक्यातील सायखेडा येथील गोदानगर भागात बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. अवघ्या सव्वा महिन्यापूर्वी ज्या शेतात बिबट्याने बालकाचा बळी घेतला होता तेथेच मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दि. २३ सप्टेंबर रोजी सायखेडा येथील गोदानगर भागातील कुटे यांच्या शेतात बिबट्याने सार्थक महेश सोळसे या तीनवर्षीय बालकाचा बळी घेतला होता. परिणामी तेव्हापासून या भागात बिबट्याची दहशत होती. वनविभागाने तातडीने गंगाधर पांडुरंग कुटे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. सुमारे सव्वा महिन्याने परत याच ठिकाणी सावजाच्या शोधात गुरुवारी (दि.२७) रात्री मादी बिबट्या आली व पिंजऱ्यात अडकली. ही मादी दीड वर्षाची आहे. ही बाब सकाळी कुटे यांच्या लक्षात आली. येवला वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी बी.आर. ढाकरे, वनपाल शंकर हिरे, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनरक्षक प्रसाद पाटील, वनसेवक दिलीप अहिरे, विजय लोंढे, भय्या शेख, रामचंद्र गंडे आदिंनी तातडीने सायखेडा येथे कुटे यांच्या वस्तीवर जाऊन पिंजऱ्यात बंद झालेला मादीला जंगलात सोडण्यासाठी पुढील कार्यवाही केली. (वार्ताहर)