.....पुन्हा एक बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 10:41 PM2020-12-01T22:41:38+5:302020-12-02T00:01:03+5:30
घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील कविता आनंदा मधे (६) बिबट्याच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. या घटने ...
घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील कविता आनंदा मधे (६) बिबट्याच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. या घटने नंतर वनविभागातर्फे लावण्यात आलेला पिंजऱ्यात चार दिवसापूर्वी बिबटया जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. दरम्यान चारच दिवसात आज पहाटेही पुन्हा दुसरा बिबट्या जेरबंद झाला आहे.
या जंगल व परिसरात ४ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावले होते. गेल्या आठवड्यात ( दि. २४नोव्हेंबर ) रोजी पहाटेच्या सुमारास एक नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. मंगळवारी (दि.१) पुन्हा एक बिबट्या जेरबंद करण्यात आला. आज पकडण्यात आलेला बिबट्या हा ज्या ठिकाणी चिमुरडीवर हल्ला केला होता, त्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे.
गेल्या आठवड्यात जेरबंद झालेल्या बिबट्यापेक्षा हा बट्या त्याच वयाचा साधारण चार ते साडे चार वर्षांचा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वनविभागातर्फे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वन परिमंडळ अधिकारी ई. टी. भले, वनरक्षक एस. के. बोडके, एफ. जे. सय्यद, आर. टी. पाठक, एम. जे. पाडवी, बी. एस. खाडे आदी उपस्थित होते.
तालुक्यातील बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून पूर्व भागात नागरिकांवर बिबट्याचे हल्ले करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. पिंपळगाव मोर व परिसरातील भागात दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या चर्चा गावातून होतचं आहेत. दोन दिवसांपूर्वी धामणी व अडसरे परिसरात देखील सायंकाळच्या वेळेस बिबट्या दिसला होता. परिसरात अजूनही चार ते पाच बिबटे असल्याच्या छुप्या चर्चाही होत आहेत. अजून काही दिवस पिंजरे ठेवावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने दहशत निर्माण झालेली आहेच. शिवाय गावातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेताला पाणी देण्यासाठी शेतीकडे जावे लागते. त्यामुळे गावकाऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी
बिबट्या जेरबंद झाल्याची वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली व फोटोसेशनही जोरात झाले. फोटो काढणारांच्या गोंधळामुळे बिबट्या मध्येच डरकाळी फोडून पिंजऱ्याला धडक देत होता.