समृध्दी महामार्गवर ३५ फूट उंच पुलावरुन कोसळली कार; कारचा चक्काचूर, सुदैवाने जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 19:21 IST2023-06-25T19:20:49+5:302023-06-25T19:21:19+5:30
या अपघातातल घनसोली आणि नवी मुंबईतील तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समृध्दी महामार्गवर ३५ फूट उंच पुलावरुन कोसळली कार; कारचा चक्काचूर, सुदैवाने जीवितहानी नाही
शैलेश कर्पे -
नाशिक - समृध्दी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटलेली कार सुमारे ३५ फूट उंच असलेल्या पुलाच्या कठड्यावरुन थेट अंडरपासच्या शिवार रस्त्यावर कोसळल्याची घटना सिन्नर तालुक्यातील आगासखिंड शिवारात दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. या अपघातातकारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातातल घनसोली आणि नवी मुंबईतील तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घनसोली, नवी मुंबई येथील गोयल कुंटुबातील तिघे स्विफ्ट कार (एम. एच. ४३ बी. यू ०१३२)ने घोटीकडून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. भरवीर येथील समृध्दी महामार्गाच्या टोल प्लाझाने एन्ट्री करुन ते समृध्दी महामार्गाने शिर्डीच्या दिशेने निघाले होते. कार आगासखिंड शिवारात आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. आगासखिंड शिवारात ५९०.५ किलोमीटरजवळ असलेल्या अंडरपासच्या पुलाजवळ दोन्ही लेनच्या मधोमध असलेल्या ब्रीजच्या संरक्षक कठड्याला कारने धडक दिली. त्यानंतर कार खालून जाणाऱ्या शिवार रस्त्यावर कोसळली. सुमारे ३५ फूट उंचावरुन कार आगासखिंडच्या शिवार रस्त्यावरील कूपनलिका रस्ता भागात कोसळल्यानंतर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.
महामार्गाच्या कामावर असलेल्या काहीजणांनी अपघात पाहिल्यानंतर तातडीने टोलनाक्यावर अपघाताची माहिती कळविण्यात आली. या अपघातात सनरीस गोयल (५३), हेमीना गोयल (४८) व दिव्या गोयल(२४) सर्व रा. घनसोली, नवीमुंबई हे तीघे जखमी झाले. रुग्णवाहिकेतून त्यांना एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली.