पिंपळगावी कारने घेतला अचानक पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 10:16 PM2021-04-28T22:16:40+5:302021-04-29T00:45:54+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील जोपुळरोड बाजार समितीच्या शिवारात मारुती व्हॅनमध्ये बिघाड झाल्याने अचानक गाडीने पेट घेतला. त्यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेत मारुती व्हॅनचे पूर्णपणे नुकसान झाले. कारला आग लागताच तातडीने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. मात्र, अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

सीएनजी लीक किंवा शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
जोपुळ रोड परिसरात राहणारे कपिल खोडे हे आपल्या मारुती व्हॅन (क्रमांक एमएच १५ सीएम ८६९०) ने पिंपळगाव येथे घरातील किराणा खरेदीसाठी गेले होते. परत येत असताना जोपुळ रोड डाव्या कालव्यापासून २०० मीटरवर व्हॅनमधून धूर येऊ लागला. वायरिंगमधील बिघाडामुळे गॅस व पेट्रोलने अचानक पेट घेतला व गाडीतून धूर निघू लागला. यावेळी घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन चालक कपिल खोडे त्यांनी तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला लावली. ते गाडीतून बाहेर पडले असता गाडीने क्षणातच पेट घेतला आणि गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाचे कर्मचारी विनायक गवांदे, वसंत काळे, रवींद्र बैरागी यांनी आगीवर नियंत्रण आणले तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पिंपळगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रवींद्र झाल्टे ,शांताराम निंबेकर, रवी बाराहाते आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहनांची गर्दी दूर केली. या घटनेची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सतर्कता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन
लॉकडाऊनमुळे गेल्या पंधरा दिवसांपासून मारुती व्हॅन घराच्या परिसरात उभी होती. त्यामुळे कदाचित उंदरांनी गाडीतील वायरिंग कुरतडली असावी आणि ती लक्षात न आल्याने सदर घटना घडल्याची प्राथमिक माहिती चालकाने दिली. त्यामुळे कडक उन्हाळा व लॉकडाऊन असल्याने बाहेर निघताना आपल्या वाहनांची व आपली काळजी घ्यावी. कारण, उन्हाळ्यात आगीने पेट घेतलेल्या घटना नेहमी घडत असतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.