फुटपाथवर कार, खड्ड्यात गेल्या मोटारसायकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:33 AM2019-06-24T00:33:53+5:302019-06-24T00:34:15+5:30

शहरातील सर्वात मध्यवर्ती मार्ग स्मार्ट करण्यासाठी सुरू असलेले काम सुरूच आहे. एका भागातील काम पूर्ण झाले आणि दुसऱ्या बाजूने खोदकाम सुरू असल्याने एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असली तरी हा रस्ता म्हणजे शिक्षा ठरला आहे.

The car on the sidewalk, the motorcycle in the pit | फुटपाथवर कार, खड्ड्यात गेल्या मोटारसायकली

फुटपाथवर कार, खड्ड्यात गेल्या मोटारसायकली

googlenewsNext

आॅन दी  स्पॉट

नाशिक : शहरातील सर्वात मध्यवर्ती मार्ग स्मार्ट करण्यासाठी सुरू असलेले काम सुरूच आहे. एका भागातील काम पूर्ण झाले आणि दुसऱ्या बाजूने खोदकाम सुरू असल्याने एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू असली तरी हा रस्ता म्हणजे शिक्षा ठरला आहे. मुळातच अरुंद रस्ता त्यातच फुटपाथ आणि त्यावर कार असा विचित्र प्रकार असून, सायकल ट्रॅकचा मोटारसायकल ट्रॅक झाला आहे. त्यामुळे हा स्मार्ट रस्ता नेमका कधी पूर्ण होणार आणि नागरिकांचा छळ कधी थांबणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावठाण भागाला जोडणारा महत्त्वाचा रहदारीचा रस्ता म्हणून नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या रस्त्याची निवड केली. हा पथदर्शी प्रकल्प असून, अवघा १.१ किलोमीटरचा रस्ता निवडण्यात आला आहे. परंतु हा एक किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या ठेकेदाराला वर्षभराचा कालावधी लागला असून, अजूनही केवळ अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा रस्ताच भागश: खुला केला आहे. त्यावर इतकी प्रचंड वर्दळ वाढली आहे की, जीव मुठीत धरूच चालावे लागते. मुळातच या मार्गावर तीन प्रमुख शाळा आहेत. त्या मेहेर ते त्र्यंबक नाका परिसरात आहेत. त्यांना गेल्या वर्षभरापासून खड्ड्यातून प्रवास करावा लागला. पावसाळ्यात तर प्रचंड हाल झाले. आता हा रस्ता सुरू झाला असला तरी समोरील बाजूचा रस्ता खोदून एकतर्फी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याने शाळेतील मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
आधी रस्ता, मग सायकल ट्रॅक तसेच पादचारी मार्ग त्यावर स्मार्ट बस थांबे असे अनेक प्रकारचे स्वप्न दाखवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अरुंद रस्ता आणि त्यावर मोटारींचे, मोटारसायकलींचे अतिक्रमण आहे. मुलांना पादचारी मार्गावरून जाणेही कठीण झाले आहे. त्यातच एखादी बस या मार्गावरून आली की पूर्ण रस्ताच बंद होऊन जातो. या भागात शासकीय कामासाठी येणाºया नागरिकांना तर खड्ड्यातूनच न्यायालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जावे-यावे लागत आहे. कोणी स्थानिक नागरिकाने दुचाकी आणली की सीबीएसजवळील खड्ड्यात ती उभी करून मगच चालावे लागते.
स्मार्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यामुळे वाढणारा वेग मात्र महापालिकेच्या या स्मार्ट रोडचा अर्थाअर्थी स्मार्ट या शब्दाशी संबंध नसून सरधोपट रस्त्यासाठी नागरिकांचा छळ करावा लागत आहे. हा रस्ता कधी पूर्ण करणार हे महापालिका किंवा स्मार्ट कंपनी अद्याप जाहीर करण्यास तयार नसल्याने नागरिकांचे हाल कधी संपणार हे मात्र स्पष्ट होत नाही.
सायकल नव्हे मोटारसायकल ट्रॅक
कंपनीने मुख्य रस्त्याच्या कडेला सायकल ट्रॅकची आखणी केली आहे. त्यातून सायकली तर जात नाही, परंतु बहुतांशी ठिकाणी मोटारसायकली उभ्या करण्यासाठी वापर होतो. विशेषत: अशोकस्तंभ ते मेहेर परिसरात दुकाने आणि कार्यालयांत जाण्यासाठी कंपनीने वाहनतळांची कोणतीही सोय केली नसून त्यामुळे रस्त्यावरच दुचाकी उभ्या कराव्या लागणार आहेत.
अशोकस्तंभावर गोंधळ
अशोकस्तंभावरील वाहतूक बेट हटविण्यात आले असून, आता गंगापूररोड, मेहेरकडून जाणाºया वाहतुकीची तर घारपुरे घाटाकडून येणाºया वाहनांची गर्दी असते. वकीलवाडीकडून येणाºया वाहनांना हॉटेल मराठा दरबारकडून येण्यासाठी किंवा वकीलवाडीत जाण्यासाठी असलेला मार्ग बंद केला आहे. त्यामुळे बहुतांशी वाहनचालक हे मल्हारखाण येथून रविवार पेठेतून राँगसाईडने अशोकस्तंभाकडे येत असल्याने तेथे गोंधळ उडतो.
जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्धारावर कोंडी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून नागरिक, कर्मचारी मेहेरकडे दुभाजकाकडून जाऊ-येऊ शकतात. या पंक्चरच्या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. विशेषत: सकाळ-सायंकाळ मोटारी रस्ता ओलांडत असताना मेहेरकडील बाजूदेखील ठप्प होते.

Web Title: The car on the sidewalk, the motorcycle in the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.