वाहक-चालकाकडून मृतदेहाची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:25 PM2020-01-18T22:25:51+5:302020-01-19T01:11:34+5:30
शिर्डी येथून उपचार करून पत्नी व दिव्यांग मुलासह राज्य परिवहन महामंडळाच्या बसने घरी परतणाऱ्या बारकू भिवसन जाधव (६५) यांना मालेगावजवळ बसमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शिरपूर आगाराच्या वाहक व चालकाने बस रुग्णालयात नेत त्यांना दाखल न करता थेट जुना बसस्थानकावर उतरवून देत त्यांच्याकडून तिकीट घेऊन बस शिरपूरकडे घेऊन गेले.
मालेगाव : शिर्डी येथून उपचार करून पत्नी व दिव्यांग मुलासह राज्य परिवहन महामंडळाच्या बसने घरी परतणाऱ्या बारकू भिवसन जाधव (६५) यांना मालेगावजवळ बसमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शिरपूर आगाराच्या वाहक व चालकाने बस रुग्णालयात नेत त्यांना दाखल न करता थेट जुना बसस्थानकावर उतरवून देत त्यांच्याकडून तिकीट घेऊन बस शिरपूरकडे घेऊन गेले.
मानवतेला काळिमा फासणाºया व मृतदेहाची हेळसांड करणाºया वाहक व चालकावर कारवाई करावी, अशी मागणी जाधव कुटुंबीय, नगरसेवक मदन गायकवाड व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. मयत बारकू भिवसन जाधव (६५) रा. गिगाव, ता. मालेगाव. ह.मु. मांदुर्णे, ता. चाळीसगाव यांना शिर्डी येथील रुग्णालयात एमआरआय करण्यासाठी त्यांच्या पत्नी रेशमाबाई जाधव, दिव्यांग मुलगा प्रकाश जाधव घेऊन गेले होते. उपचारानंतर शिरपूर आगाराच्या बसने (क्र. एमएच २० ३९९३) मालेगावी परतत होते. शहरालगतच्या मनमाड चौफुली ते मोसमपूलदरम्यान जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. अशा स्थितीत जाधव कुटुंबीय हतबल झाले होते. वाहक पी.के. पाटील व चालक विजय सोनवणे यांनी जाधव यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असताना जुना बसस्थानकावर मृतदेह सोडून व त्यांच्याकडून दिलेले तिकीटही हिसकावून शिरपूरकडे पळ काढला.
या घटनेची माहिती नगरसेवक मदन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेलार व जाधव यांच्या नातलगांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बसस्थानक प्रमुख व आगारप्रमुख के. बी. धनवटे यांना धारेवर धरले. मानवतेला काळिमा फासणाºया व मृतदेहाची हेळसांड करणाºया वाहक व चालकावर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी शहर पोलिसांनी मध्यस्थी केली तसेच मालेगावचे आगारप्रमुख धनवटे यांनी संबंधित शिरपूर आगाराच्या आगारप्रमुखाशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून कारवाई करावी, असे सांगितले.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चालक व वाहकावर कारवाईचा प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह नातलगांनी ताब्यात घेतला. यानंतर शवविच्छेदनाच्या ठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद किल्ला की शहर पोलीस ठाण्यात करायची यावरूनही वाद झाला. नगरसेवक गायकवाड यांच्यासह कुटुंबीयांनी संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले. या घटनेमुळे लोकसेवकांची मुजोरी समोर आली आहे.
..केले मृत घोषित
बस प्रवासात अत्यवस्थ झालेल्या बारकू जाधव यांना शासकीय किंवा खासगी रुग्णालयात दाखल न करता असंवेदनशील वाहक पी. के. पाटील व चालक विजय सोनवणे यांनी स्वत:च मृत घोषित केल्याचा प्रताप केला.