कल्पक योजनांची पायाभरणी करणारी कारकीर्द
By admin | Published: February 6, 2017 11:28 PM2017-02-06T23:28:11+5:302017-02-06T23:28:28+5:30
कल्पक योजनांची पायाभरणी करणारी कारकीर्द
इतिहास चाळताना
महापालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत कामकाजात बऱ्यापैकी प्रगल्भता आली होती. महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत अशी प्रगल्भता नव्हती अशातला भाग नाही. उलट नगरपालिका काळापासून कामकाजाचा अनुभव असणारे अनेक ज्येष्ठ नगरसेवक होते, परंतु दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये नावीन्याचा शोध घेणारी नवीन पिढी पालिकेत आली. त्याचा फायदाच झाला. नाशिकमध्ये अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची चर्चा झाली. फाळके स्मारक हे रंजक ठरावे, ही त्यातीलच एक चर्चा. त्याचप्रमाणे शहरात मोठे सोहळे व्हावे, असे एखादे मोठे सभागृह असावे, अशी एक कल्पना मांडण्यात आली. त्यामुळे त्याचेच पुढे तीन हजार आसन क्षमतेच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात रूपांतर झाले. त्यामुळे कालिदास कलामंदिरापेक्षा मोठे सभागृह शहरात तयार झाले. छोटेखानी कार्यक्रमांसाठी शहरात दोनशे तीनशे आसन क्षमतेचे एखादे सभागृह किंवा नाट्यगृह असले पाहिजे, असा विचार पुढे आला. त्यातून पं. पलुस्करांच्या नावाने इंद्रकुंडावर दोनशे आसनी क्षमतेचे सभागृह साकारण्यात आले. हनुमानवाडीत कुसुमाग्रज काव्य उद्यानाची कल्पक संकल्पना पुढे आली आणि कुसुमाग्रजांच्या निवडक कविता उद्यानात उभारण्यात आल्या. इतकेच नव्हे तर बोटिंग करून नदी पार करण्याची कल्पनाही काहीकाळ साकारली गेली. नाशिकला एचएएलची भेट देणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती तारांगण करावे ही योजनादेखील त्यावेळी आखली गेली. स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाशेजारी सध्या ज्या जागेत हे तारांगण आहे, तेथे चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कचे आरक्षण विकास आराखड्यात होते. त्यामुळे काहीसा वादही झाला. परंतु नंतर त्याचे भूमिपूजन झाले. महापालिका आणि ‘लोकमत’च्या माध्यमातून पालिकेच्या राजीव गांधी भवनावर इलेक्ट्रॉनिक बोर्ड लावून वृत्तसेवा सुरू करण्यात आली होती. शहरातील दैनंदिन घडामोडी पाहण्यासाठी नागरिक आवर्जुन थांबत. अशा अनेक योजना त्या काळात आल्या आणि चर्चेत ठरल्या. - संजय पाठक