संमेलनासाठी बारकाईने नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:25 AM2021-02-18T04:25:06+5:302021-02-18T04:25:06+5:30
नाशिक : संमेलनात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, कवी कट्टा, निमंत्रितांचे कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन या मुख्य कार्यक्रमांसाठी येणाऱ्या ...
नाशिक : संमेलनात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, कवी कट्टा, निमंत्रितांचे कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन या मुख्य कार्यक्रमांसाठी येणाऱ्या हजारो रसिकांसाठी पायाभूत सोयीसुविधा, तातडीच्या सुविधा, आरोग्य सुविधांच्या दृष्टीने बारकाईने नियोजन करण्यास प्रारंभ झाला आहे.
स्वच्छता, पाणी पुरवठा व विद्युत व्यवस्था समितीची सभा पालक पदाधिकारी सुनील भुरे व प्रमुख सुनील वाणी यांच्या उपस्थितीत झाली. या सभेस नंदकिशोर हरकुट, रोहिणी रकटे, हिमांशू धोडपकर, तुषार सावरकर आदी समिती सदस्य उपस्थित होते. त्याशिवाय संयोजन व नियोजन समितीची सभा प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली, तसेच प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. तसेच मंडप उभारणी, स्टेजची व्यवस्था, निमंत्रण पत्रिकांचे वाटप, प्रमाणपत्र वाटप, बाहेरून आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था, रसिकांची उपस्थिती, ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन, स्टॉलधारकांना येणाऱ्या अडचणी, पोलीस यंत्रणा व शासन यंत्रणेशी संपर्क आदी विषयांवरदेखील सविस्तर चर्चा झाली. तसेच संमेलनाच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद, कवी कट्टा, निमंत्रितांचे कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रम होणार असल्याने त्यातील नियोजनावर चर्चा होऊन त्याप्रमाणे नियोजन करण्याचे ठरले. यावेळी मिलिंद कुलकर्णी, प्रीतम नाईक, विद्या खरात, ॲड. अविनाश देशपांडे, रूपाली नेर, पराग घारपुरे, महेंद्र बच्छाव, डॉ. भास्कर गिरिधारी, मंगेश मालपथक आदी उपस्थित होते. तसेच सत्कार समिती, काव्यवाचन व नियोजन समिती व सभामंडप सजावट समितीच्याही सभा पार पडल्या.
इन्फो
स्वच्छतेसह सर्व दक्षता
संमेलनकाळात तिन्ही दिवस संमेलन परिसरात २४ तास किमान २ घंटागाड्या उपलब्ध करणे, मनपाचे किमान २० स्वच्छता कर्मचारी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत परिसरात उपस्थित राहतील, याची काळजी घेणे, दररोज संध्याकाळी फॉगिंगची व्यवस्था, भोजनस्थळी परिसरात पूर्णपणे स्वच्छता राहण्याबाबत दक्षता घेणे, किमान १०० ठिकाणी डस्टबीनची व्यवस्था करणे, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.