गिरणा धरण जलवाहिनीच्या पाणी गळतीकडे काणाडोळा
By Admin | Published: September 8, 2015 10:46 PM2015-09-08T22:46:17+5:302015-09-08T22:48:18+5:30
अपव्यय : मालेगावी दुष्काळात तेरावा महिना
मालेगाव : येथील महानगरपालिकेने पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हद्दीत
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे येथील गिरणा पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणी गळतीकडे काणाडोळा केला आहे. ही गळती थांबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यात धरणात पाणी साठा नसल्याने पाणी जपून वापरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चणकापूर व गिरणा धरणातील पाणी साठ्याचा अंदाज घेऊन मनपाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. असे असताना येथील गिरणा धरण पाणीपुरवठ्याची योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यापूर्वीच जलवाहिनी सडली आहे. त्यामुळे पाण्याची गळती होत आहे. ही गळती दिवसेंदिवस वाढत असून, सध्या सुमारे दोन ते तीन इंच पाणी बाहेर फेकले जात आहे. याविषयी अनेकांना तक्रारी केल्या नंतरही मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने या दुरुस्तीकडे काणाडोळा केला असल्याचे वाया जाणाऱ्या पाण्यावरून दिसून येते. या भागात अहोरात्र सुरू असलेल्या पाणी गळतीने रोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असून, ते परिसरात साचत आहे. त्यामुळे तेथे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही पाणी गळती थांबविण्याऐवजी मनपाने सरळ दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. या पाणी गळतीला दीड ते दोन वर्ष झाले आहेत. या काळात किती पाणी वाया गेले? हा संशोधनाचा विषय आहे. (प्रतिनिधी)