स्थायीच्या एका जागेवरून सेना-भाजपात कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:25 AM2019-07-09T01:25:08+5:302019-07-09T01:25:30+5:30
स्थायी समितीच्या एका जागेसाठी शिवसेनेने केलेली दावेदारी फसल्यानंतर या पक्षाने आता युतीचे नवे कार्ड खेळले असून, एका जागेवर रिपाइंच्या एकमेव नगरसेवक असलेल्या दीक्षा लोंढे यांना संधी द्यावी, असा आग्रह धरला आहे.
नाशिक : स्थायी समितीच्या एका जागेसाठी शिवसेनेने केलेली दावेदारी फसल्यानंतर या पक्षाने आता युतीचे नवे कार्ड खेळले असून, एका जागेवर रिपाइंच्या एकमेव नगरसेवक असलेल्या दीक्षा लोंढे यांना संधी द्यावी, असा आग्रह धरला आहे. भाजपा मात्र आपल्या कोट्यातील जागा देण्यास तयार नसून अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असल्याने पक्ष कोणाला संधी देतो हे मंगळवारीच (दि.९) स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, भाजपातदेखील संभाजी मोरूस्कर प्रमुख दावेदार आहेत. त्यापलीकडे अर्चना थोरात, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील यादेखील इच्छुक आहेत. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पक्षाचे संघटन मंत्री अंतिम नाव कळवणार आहेत.
स्थायी समितीच्या सोळापैकी आठ रिक्त जागांवर सात सदस्यांची निवडप्रक्रिया यापूर्वीच झाली आहे. सातपूर विभागातील सुदाम नागरे या भाजपा नगरसेवकाचे निधन झाल्याने भाजपाचे तौलनिक बळ घटले, असा दावा शिवसेनेने केला होता. मात्र तो निकाली निघालाच शिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपा-सेना युती झाल्याने नेत्यांची अडचण झाली. नागरे यांच्या रिक्त जागेवर प्रभाग दहाच्या पोटनिवडणुकीतदेखील सेनेने दावेदारी केली, परंतु त्यातही भाजपाने बाजी मारली. त्याची परतफेड म्हणून सातपूरचे प्रभाग सभापतिपद घेतले. परंतु तरीही स्थायी समितीचा नाद सोडला नाही.
मंगळवारी (दि.९) महापालिकेची विशेष महासभा होणार असून, त्यात स्थायी समितीच्या एका रिक्त जागेवर भाजपा सदस्य नियुक्त करणार आहे. याचवेळी पाच अन्य विषय समितींच्या सदस्यपदाची निवडप्रक्रिया होणार असून त्यासाठी तरतुदीनुसार सर्व गटनेत्यांची बैठक महापौर रंजना भानसी यांनी सोमवारी (दि. ८) घेतली होती.
यावेळी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी ज्याप्रमाणे केंद्रात मोदी सरकारमध्ये रिपाइंला स्थान दिले गेले त्याच पद्धतीने नाशिकमध्ये स्थायी समितीच्या एका जागेवर दीक्षा लोंढे यांना संधी द्यावी, अशी मागणी केली.
आज पाच समित्या ठरणार
महापालिकेच्या पाच विषय समित्यांच्या सदस्यांची निवड मंगळवारी (दि.९) विशेष महासभेत होणार आहे. यात महिला व बाल कल्याण समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, विधी, समिती, शहर सुधार समिती या समित्यांच्या निवडप्रक्रिया राबविल्या जाणार आहेत.