लोकप्रतिनिधींच्या समन्वयाअभावीच कारकीर्द वादग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:14 AM2018-11-22T01:14:45+5:302018-11-22T01:15:01+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या मात्र, त्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केले असते तर अशी वेळ आली नसती. लोकप्रतिनिधी ही लोकहिताचीच कामे घेऊन येतात. त्यामुळे त्यांची कामे टाळण्यापेक्षा आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक होते.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या मात्र, त्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केले असते तर अशी वेळ आली नसती. लोकप्रतिनिधी ही लोकहिताचीच कामे घेऊन येतात. त्यामुळे त्यांची कामे टाळण्यापेक्षा आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक होते. तसे न झाल्याने तसेच करवाढ, मनमानी निर्णय आणि लोकप्रतिनिधींच्या अवमानामुळेच त्यांना मुदतपूर्व बदलीला सामोरे जावे लागल्याची भावना महापालिकेतील विरोधी पक्षांच्या गटनेत्यांनी व्यक्त केली.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची नाशिकला बदली झाल्यानंतर ते नाशिक शहराचा खूप मोठा विकास करतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. प्रशासकीय नेतृत्व ते योग्य पद्धतीने करू शकले नाही. कर्मचाऱ्यांवर कामाचे एकप्रकारचे दडपण कायम राहिले. नाशिककरांवर कराचा बोजा लादला. मुंढे यांच्या चांगल्या कामाला शिवसेनेने पाठिंबाच दिला. आत्ता ७० टक्के नाशिक शहरच बेकायदेशीर दाखवले आहे. संवग प्रसिद्धीसाठी त्यांनी असे अनेक निर्णय घेतले. त्यामुळे साहजिकच आयुक्तांच्या विरोधात शिवसेनेने भूमिका घेतली. त्या दबावामुळेच राज्य सरकारला त्यांच्या बदलीचा निर्णय घ्यावा लागला. - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, मनपा
महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला शिस्त लावत चांगले काम केले, परंतु दुर्दैवाने सत्तारूढ गटाने त्यांची बदनामी केली आणि बदलीसाठी कारस्थान केले. सत्तारूढ भाजपाच्या कृतीमुळे एक चांगला प्रशासकीय अधिकारी त्यांनी नाशकातून घालवला आहे. अर्थात आयुक्तांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम केले असते तर ही वेळही आली नसती.
- गजानन शेलार, गटनेता, राष्टवादी कॉँग्रेस
आयुक्तांना व्यक्तिगत पातळीवर आमचा कधीही विरोध नव्हता. मात्र त्यांची कामांची पध्दत वादग्रस्त ठरली. लोकांची कामे कशी करावी आणि कोणती करावी याबाबत त्यांना आम्ही अनेकदा सूचना केल्या तसे आग्रह धरला, परंतु त्यांनी ऐकले नाही आणि त्यांच्या निर्णयातूनच त्यांच्या चुका वाढत गेल्या. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायती या संस्था लोकांच्या कामासाठी असतात, परंतु आयुक्त त्याबाबत नकारार्थी होत गेले. कालिदास कलामंदिर किंवा नेहरू उद्यानाचे लोकार्पण असो विश्वासात घेऊन निर्णय घेतले नाही. त्यांनी प्रशासनाला शिस्त लावली. शहरात सफाई कामगार दिसू लागले हे सर्व खरे असले तरी त्यांनी नागरी कामे फार केली नाही परिणामी उत्पन्न वाढल्याचे दिसते. प्रभाग समित्या या घटनेनुसार तयार करून त्यावरही साधा प्रशासनाचा प्रस्तावही आयुक्तांनी येऊ दिला नाही. आयुक्तांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित होते. - शाहू खैरे, गटनेता, कॉँग्रेस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढे यांना शहराचा विकास करायला पाठविले होते की भकास करायला हे कळलच नाही. अंगणवाड्या, बेकायदेशीर बांधकामे, शेतकºयांवर करवाढ या सर्वाचा विचार केला आयुक्त शहर भकास करायलाच निघाले होते. लोकप्रतिनिधींचा मानसन्मान त्यांनी बाळगला नाही. लोकप्रतिनिधींचा मानसन्मानच करणार नसेल तर आयुक्तांनी
निघून जावे. - सलीम शेख, गटनेता मनसे