वाहक प्रशिक्षणाला; बसफेऱ्या उशिराने
By admin | Published: July 10, 2016 12:35 AM2016-07-10T00:35:34+5:302016-07-10T00:59:10+5:30
प्रवाशांची गैरसोय : बढतीसाठी प्रशिक्षण
पंचवटी : एसटी खात्यात वाहक म्हणून काम करणाऱ्या वाहकांना कंट्रोलर म्हणून बढती मिळावी, यासाठी गुरुवारपासून विभाग नियंत्रकात सलग तीन दिवस सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी बस आगारातील वाहक गेल्याने त्याचा परिणाम शहरातील बसफेऱ्यांवर झाला असल्याची ओरड प्रवाशांनी केली आहे. वाहक प्रशिक्षणाला गेले असले तरी शहरातील बसफेऱ्या नियमाने चालू आहेत; मात्र नियमित वेळेपेक्षा पंधरा ते वीस मिनिटे बस उशिराने ठरलेल्या मार्गावर पोहोचत असल्याची कबुली एसटी खात्याकडून देण्यात आली.
पंचवटी आगारातून संपूर्ण शहरात प्रवाशांची तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी दैनंदिन बसेस ठरलेल्या मार्गावर जातात. गुरुवारपासून विभाग नियंत्रकात वाहकांना बढती मिळावी यासाठी तीन तासांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले असल्याने बस आगारातील ठरलेल्या कर्मचारी यादीनुसार विभाग नियंत्रकात प्रशिक्षणाला जात असल्याने ठरलेल्या मार्गावर बसेस धावत आहेत; मात्र त्या नियोजित वेळेत जाण्याऐवजी पंधरा ते वीस मिनिटांनी उशिरा पोहोचत
आहे.
बस वेळेवर येत नसल्याने त्याचा फटका प्रवासी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. प्रशिक्षण सुरू राहणार असल्याने तोपर्यंत बसेस नियमित वेळेपेक्षा थोड्याफार फरकाने उशिराने ठरलेल्या मार्गावर पोहोचतील तसेच या प्रशिक्षणामुळे कोणत्याही प्रकारे बससेवा बंद करण्यात आलेली नाही, असेही एसटीच्या वतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)