कॅरोल गीताने दुमदुमले शहरातील चर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:45 AM2017-12-25T00:45:17+5:302017-12-25T00:49:19+5:30
नाशिक : नाताळ अर्थात ख्रिसमसनिमित्त रविवारी (दि.२४) मध्यरात्री शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती समाजबांधवांनी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी ‘कॅरोल’ गीताने शहरातील चर्च दुमदुमले होते. ख्रिसमसनिमित्त सर्व चर्च आकर्षक रोषणाईने उजळून निघाले होते.
नाशिक : नाताळ अर्थात ख्रिसमसनिमित्त रविवारी (दि.२४) मध्यरात्री शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिस्ती समाजबांधवांनी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी ‘कॅरोल’ गीताने शहरातील चर्च दुमदुमले होते. ख्रिसमसनिमित्त सर्व चर्च आकर्षक रोषणाईने उजळून निघाले होते. ख्रिस्ती संस्कृतीचा सर्वात महान सण म्हणून ख्रिसमस साजरा केला जातो. दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमसचा उत्सव जगभरात साजरा होतो. या उत्सवाची सुरुवात २४ तारखेला मध्यरात्रीपासून होते. या रात्री येशू ख्रिस्तचा जन्म झाल्याची आख्यायिका आहे. ख्रिसमस सणानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉलेजरोड, शरणपूररोड, गंगापूररोड, नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प परिसरात संध्याकाळनंतर सांताक्लॉजची वेशभूषा करून काही ठराविक समाजबांधवांनी बालगोपाळांच्या भेटी घेत त्यांना खाऊ दिला. मुलांनीही सांतासोबत हस्तांदोलन करत ‘सेल्फी’ घेतली. दरम्यान, शनिवारी शहरातील विविध इंग्रजी शाळांमध्ये ख्रिसमस पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. शहरातील संत आंद्रिया चर्च, होलिक्रॉस चर्च, डॉन बॉस्क ो शाळेतील चर्च, सेंट थॉमस चर्च, देवळाली कॅम्प परिसरातील खंडोबा टेकडीमार्गावरील चर्चसह नाशिकरोड, उपनगर परिसरातील चर्चवर आकर्षक रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. संध्याकाळी सहा वाजेपासून चर्चच्या परिसरात समाजबांधवांची वर्दळ सुरू होती. रात्री दहा वाजता वरील सर्व चर्च समाजबांधवांनी गजबजले होते. तसेच विविध ठिकाणी गव्हाणींचे देखावे सादर करण्यात आले होते.