भाजपकडून नाराज नगरसेवकांना निधीचे गाजर; बावनकुळेंकडून निधी देणार, प्रभागनिहाय माहिती मागविली
By श्याम बागुल | Published: August 1, 2023 07:59 PM2023-08-01T19:59:28+5:302023-08-01T20:00:04+5:30
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाला काहीसे झुकते माप देण्यात आले असून, नाशिक शहरातही शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला शासन दरबारी मान दिला जात आहे.
नाशिक : १०५ आमदारांच्या बळावर राज्यात भाजपने शिंदे गटाला सोबत घेऊन सत्तांतर घडवून आणले असले तरी, सत्तेची फळे शिंदे गटाकडून अधिक चाखली जात आहेत व त्यात पुन्हा राष्ट्रवादीची भर पडल्याने भाजपमध्ये गल्लीपासून मुंबईपर्यंत नाराजी व्यक्त केली जात असून, त्याचे पडसाद नाशिकच्या दौऱ्यावर येणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यातही उमटू लागले आहेत. त्यामुळेच गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्यासमोर भाजपच्या माजी नगरसेवकांनी नाराजी बोलून दाखविल्याने शिंदे गटाच्या नगरसेवकांप्रमाणे त्यांनाही शासनाकडून विशेष निधी मिळवून देण्याचे गाजर दाखविण्यात आले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाला काहीसे झुकते माप देण्यात आले असून, नाशिक शहरातही शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला शासन दरबारी मान दिला जात आहे. एवढेच नव्हे तर पालकमंत्रीपद शिंदे गटाकडे असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्यांमध्ये देखील शिंदे गट सरस ठरू लागला आहे. पूर्वीचे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले गेले होते. त्यामुळे शिंदे गटाचे ते कामे करतात असा आरोप भाजपकडून सातत्याने केला गेला.
एवढेच नव्हे तर पुलकुंडवार यांची बदली करावी यासाठी शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. त्यात ते यशस्वी झाले असले तरी, नवीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर हे देखील पालकमंत्री दादा भुसे यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या शब्दाला महापालिकेला किंमत प्राप्त झाली. हे कमी की काय मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अखत्यारितील नगरविकास विभागातून शिंदे गटाच्या तेरा माजी नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा विशेष निधी दिला आहे. अशा एकामागोमाग घटना घडत असताना भाजपमध्ये सत्तेत असूनही हात चोळण्यापलीकडे काहीच मिळत नसल्याची भावना वाढीस लागून पक्ष पदाधिकारी, माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे.