पुराच्या पाण्यात दुचाकी गेली वाहून ; नशिबाने वाचले दोघा युवकांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 01:41 AM2022-07-14T01:41:29+5:302022-07-14T01:41:52+5:30
जायखेडा येथील मोसम नदी पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत असतानाही पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाण्याचा अति आत्मविश्वास दोघा तरुणांच्या चांगलाच जिवावर बेतला. सुदैवाने नशीब बलवत्तर म्हणून या तरुणांचे प्राण वाचले. मात्र, दुचाकी वाहून गेली.
जायखेडा : येथील मोसम नदी पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत असतानाही पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाण्याचा अति आत्मविश्वास दोघा तरुणांच्या चांगलाच जिवावर बेतला. सुदैवाने नशीब बलवत्तर म्हणून या तरुणांचे प्राण वाचले. मात्र, दुचाकी वाहून गेली.
हे दोघे तरुण बुधवारी (दि.१३) संध्याकाळी आपल्या दुचाकीवरून जायखेडा येथून नदीपलीकडील वस्तीवर जात होते. पुलावरील पाण्यातून जात असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून ते मोटारसायकलसह नदीतील पुरात वाहू लागले.
यावेळी एकाने हातातील दळण सोडून देत पुलाच्या संरक्षक कठड्यास धरून ठेवले. काळजाचा ठोका चुकविणारे हे दृश्य पाहत असलेल्या काही तरुणांनी मोठ्या हिमतीने या तरुणांपर्यत जाऊन त्यास पाण्याबाहेर ओढून काढले. सुदैवाने दुसऱ्या तरुणास पोहता येत असल्याने त्याने पुराच्या पाण्यात पोहत पैलतीर गाठत आपला प्राण वाचविला.
दरम्यान, हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने मोसम नदीस आलेला पूर अद्याप ओसरला नाही. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढतच असून, ठिकठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत. महसूल प्रशासन, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.