१५ लाख मागितल्या प्रकरणी चांदवडच्या नगराध्यक्षाविरुद्ध गुन्हा
By admin | Published: March 5, 2016 11:06 PM2016-03-05T23:06:14+5:302016-03-05T23:07:20+5:30
चिंतामण शिक्षण संस्था: अर्चना कासलीवाल, पांडे यांच्याविरुद्धही कारवाई
नाशिक : आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नीस समाजकल्याण विभागाने दिलेल्या आदेशानुसार अनुकंपा तत्त्वावर शिक्षक म्हणून सामावून घेण्यासाठी १५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चांदवडच्या चिंतामण शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष अर्चना कासलीवाल आणि त्यांचे चिरंजीव तथा चांदवडचे नगराध्यक्ष भूषण जयचंद कासलीवाल यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार चांदवड येथील अर्चना कासलीवाल यांची चिंतामण शिक्षण प्रसारक संस्था असून, या संस्थेची राजदेरवाडी येथे आश्रमशाळा आहे़ या ठिकाणी तक्रारदार महिलेचा पती मुख्याध्यापक म्हणून नोकरीस होता़ २०१२ मध्ये कर्तव्यावर असताना
पतीचे अपघाती निधन झाल्याने अनुकंपा तत्त्वावर संस्थेत शिक्षकाची नोकरी मिळावी यासाठी तक्रारदार महिलेने समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे अर्ज केला होता़ त्यानुसार या महिलेस नोकरीत सामावून घेण्याचे व प्रस्ताव सादर करण्याचे आदेश समाजकल्याण विभागाने चिंतामण संस्थेस दिले होते़
समाजकल्याण विभागाच्या या आदेशानुसार तक्रारदार महिला २७ सप्टेंबर २०१५ मध्ये संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना भेटण्यासाठी गेल्या असता सचिव वर्धमान पांडे व अध्यक्षांचा मुलगा भूषण कासलीवाल यांनी शिक्षिका म्हणून रुजू करण्याचे पत्र देण्यासाठी १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली़ यामुळे तक्रारदार महिलेने ६ आॅक्टोबर २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानुसार ८ आॅक्टोबर रोजी सापळा रचण्यात आला होता़ या दिवशी संस्थेचा सचिव वर्धमान पांडे हा तक्रारदार महिलेच्या घरी आला व सध्या निवडणुकीचे काम सुरू आहे त्यामुळे निवडणुकीनंतर पैसे घेऊन जाईल, असे सांगून निघून गेला़
दरम्यान, संस्थेचा सचिव वर्धमान पांडे व संस्था अध्यक्षांचा मुलगा भूषण कासलीवाल या दोघांनी राजदेरवाडी येथील अनुदानित आश्रमशाळेत शिक्षकाच्या नोकरीसाठी तक्रारदार महिलेकडे १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा पुरावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागास मिळाल्याने या दोघांविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि़५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)