‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ची केस चोवीस तासात निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 04:47 PM2019-05-20T16:47:45+5:302019-05-20T16:48:38+5:30
सिन्नर : मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी दंड
नाशिक : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत मद्य प्राशन केलेल्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालविल्याप्रकरणी सिन्नर न्यायालयाने चालकास १२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे सिन्नर पोलिसांनीही याबाबत तातडीने चार्जशीट दाखल केल्याने दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने दंड ठोठावला.
गुरूवारी (दि. १६) रात्री सिन्नर पोलीस सिन्नर-नाशिक मार्गावर गस्त घालत असताना ८ वाजेच्या सुमारास सिन्नर महाविद्यालयासमोर त्यांना एक क्रेन चालक भरधाव वेगात, वाकडी तिकडी नागमोडी वळणे घेत सिन्नरकडे येताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्यास क्रेन (एमएच-१५, एफव्ही-८८९४) थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर पोलिसांनी के्रनवरील चालक भरत वसंत मोरे (२६) रा. राशेगाव, ता. दिंडोरी यास ताब्यात घेतले असता तो मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिस शिपाई विनोद टिळे यांनी याबाबत सिन्नर पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, संशयिताची दोडी ग्रामीण रूग्णालयात तपासणी केली असता त्याने अमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दुस-या दिवशी शक्रवारी (दि. १७) पोलिसांनी त्यास दोषारोपासह सिन्नर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने मद्यप्राशन करून भरधाव वेगात क्रेन चालविल्याप्रकरणी मोरे यास १२ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान २४ तासांच्या आत ‘ड्रक अॅण्ड ड्राईव्ह’ची ही केस निकाली काढण्यात आली. पोलीस नाईक शहाजी शिंदे, विनोद टिळे यांनी ही कामिगरी केली.