जुगार प्रकरणी नगरसेवक शेट्टीविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 02:03 AM2018-11-14T02:03:40+5:302018-11-14T02:03:57+5:30
पंचवटीतील वाल्मीकनगरजवळील मेरी हायड्रोच्या मोकळ्या जागी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़१२) सायंकाळी छापा टाकला़ विशेष म्हणजे याठिकाणी भाजपा नगरसेवक संशयित हेमंत शेषअण्णा शेट्टीसह आठ संशयित जुगार खेळत होते़ पोलिसांना पाहता नगरसेवक हेमंत शेट्टी (रा़ कृष्णनगर, पंचवटी) व त्याचे साथीदार भारत पुराणिक ऊर्फ ड्रॅगन, सचिन पाटील ऊर्फ जॅक हे तिघे फरार झाले होते़
नाशिक : पंचवटीतील वाल्मीकनगरजवळील मेरी हायड्रोच्या मोकळ्या जागी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवारी (दि़१२) सायंकाळी छापा टाकला़ विशेष म्हणजे याठिकाणी भाजपा नगरसेवक संशयित हेमंत शेषअण्णा शेट्टीसह आठ संशयित जुगार खेळत होते़ पोलिसांना पाहता नगरसेवक हेमंत शेट्टी (रा़ कृष्णनगर, पंचवटी) व त्याचे साथीदार भारत पुराणिक ऊर्फ ड्रॅगन, सचिन पाटील ऊर्फ जॅक हे तिघे फरार झाले होते़
गुन्हे शाखेचे प्रवीण कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पंचवटी परिसरातील वाल्मीकनगरमधील मेरी हायड्रोच्या मोकळ्या जागेवरील बाभळीच्या झाडाखाली जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला असता संशयित हेमंत शेट्टी, जमील आसिफ शेख (गणेश चौक, सिडको), कुणाल दशरथ पाटील (पंचवटी), रमिज इकबाल शेख (कलानगर, इंदिरानगर), योगेश गोपीनाथ आव्हाड (शिंदे चाळ, सेवाकुंज, पंचवटी), संभाजी शंकर कदम (पृथ्वी टॉवर, देवळाली गाव), भारत पुराणिक, सचिन पाटील हे पत्त्यावर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़
पोलिसांनी पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़