थकबाकी व विवरणपत्र दाखल केल्याने संबंधितांची बॅँक खाती पूर्ववत
By admin | Published: December 10, 2014 02:01 AM2014-12-10T02:01:56+5:302014-12-10T02:03:07+5:30
थकबाकी व विवरणपत्र दाखल केल्याने संबंधितांची बॅँक खाती पूर्ववत
नाशिक : एलबीटीची थकबाकी न भरणाऱ्या आणि मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध महापालिकेने कठोर कारवाईचे सत्र सुरूच ठेवले असून, आणखी ३०० व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्यात येणार आहे. दरम्यान, पालिकेने सुरू ठेवलेल्या कारवाईमुळे १२५ व्यापाऱ्यांनी थकबाकी व विवरणपत्र दाखल केल्याने संबंधितांची बॅँक खाती पूर्ववत करण्यात आल्याची माहिती एलबीटी विभागाचे उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.महापालिकेने एलबीटीची थकबाकी व मुदतीत विवरणपत्र दाखल न करणाऱ्या सुमारे १६ हजार ८०० व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसा बजावूनही थकबाकी व विवरणपत्र दाखल न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे पाऊल उचलत पालिकेने बॅँक खाती सील करण्याचा धडाका लावला. पहिल्यांदा ८० व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्याने कारवाईला सुरुवात करण्यात आली. पालिकेने आतापर्यंत ५८० व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यापैकी ३५४ व्यापाऱ्यांनी कर भरणाला प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये १२५ व्यापाऱ्यांनी दंडासह थकबाकी व विवरणपत्र दाखल केल्याने संबंधितांची बॅँक खाती पूर्ववत करण्यात आली आहे. २२९ व्यापाऱ्यांनी स्वत:हून प्रतिसाद नोंदवत विवरणपत्र व थकबाकी भरण्याला प्रतिसाद दिला. विवरणपत्र मुदतीत दाखल न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध महापालिकेने ५ हजार रुपये दंड आकारणी सुरू केली आहे. या दंडापोटी पालिकेकडे आतापर्यंत १७ लाख ७० हजार रुपये इतका महसूल जमा झाला आहे. पालिकेने कारवाईची गती आता आणखी वाढविली असून, मंगळवारी आणखी ३०० व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही कारवाई टप्प्याटप्प्याने आणखी गतिमान केली जाणार असल्याचे हरिभाऊ फडोळ यांनी सांगितले.