वीजचोरी केल्याप्रकरणी ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:11 AM2018-05-31T00:11:14+5:302018-05-31T00:11:14+5:30
वडनेर-पाथर्डी रोडवरील केक शॉपमधील वीजमीटरमध्ये लुप वायर टाकून वीजमीटरच्या मूळ रचनेत फेरफार करून ८० हजारांची वीजचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : वडनेर-पाथर्डी रोडवरील केक शॉपमधील वीजमीटरमध्ये लुप वायर टाकून वीजमीटरच्या मूळ रचनेत फेरफार करून ८० हजारांची वीजचोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २७ एप्रिल २०१८ रोजी वडनेर-पाथर्डी रोडवरील जसवंत सिंग यू. चव्हाण यांच्या केक शॉपला भेट देऊन वीजमीटरची पाहणी केली. यंत्राद्वारे वीजमीटर तपासले असता ६८.२७ टक्के मंद गतीने वीजमीटर फिरत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. सदर वीजमीटर महावितरणच्या मीटर चाचणी विभागात पाठविण्यात आल्यानंतर वीजमीटरमध्ये लुप वायर टाकून मीटरच्या मूळ रचनेत फेरफार करून वीजचोरी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ७९ हजार ५८० रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले असून, महावितरणकडून ६५ हजार रुपये वीजबिल भरण्याची तजवीज ठेवली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.