वृक्षतोडप्रकरणी पांजरापोळ संस्थेवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:13 AM2017-08-31T01:13:31+5:302017-08-31T01:13:39+5:30
पेठरोडवरील अंबिकानगर पाठीमागे असलेल्या पांजरापोळ संस्थेच्या सर्व्हे क्रमांक ७७ मध्ये संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी तब्बल २८ वृक्षांची बेकायदा कत्तल केल्याप्रकरणी नाशिक पांजरापोळ संस्थेच्या व्यवस्थापकासह सुपरवायझरविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : पेठरोडवरील अंबिकानगर पाठीमागे असलेल्या पांजरापोळ संस्थेच्या सर्व्हे क्रमांक ७७ मध्ये संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी तब्बल २८ वृक्षांची बेकायदा कत्तल केल्याप्रकरणी नाशिक पांजरापोळ संस्थेच्या व्यवस्थापकासह सुपरवायझरविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा पंचवटी उद्यान विभागाचे प्रभारी निरीक्षक राहुल खांदवे यांनी या बेकायदा वृक्षतोडीबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी (दि.२९) पेठरोडवरील अंबिकानगर झोपडपट्टीच्या मागे असलेल्या पांजरापोळच्या जागेतील मोठ्या वृक्षांची पोकलॅन मशीनच्या साहाय्याने कत्तल सुरू असल्याची माहिती काही नागरिकांनी फोन करून उद्यान विभागाला कळविली होती. त्या माहितीच्या आधारे पंचवटी उद्यान विभागाचे खांदवे व पथक घटनास्थळी गेले असता तेथे सुबाभूळ, बॉटल ब्रश, विलायती चिंच, काशिद, कडुनिंब, रानभेंडी, गावठी बोर आदींसह जवळपास २५ ते ३० मोठ्या वृक्षांची पोकलॅन मशीनच्या सहाय्याने कत्तल केल्याचे निदर्शनास आले होते. मनपा उद्यान विभागाच्या पथकाला बघून वृक्षतोड करणाºयांनी तेथे पोकलॅन मशीन व अन्य साधन साहित्य सोडून पळ काढला होता. उद्यान विभागाच्या वतीने वृक्षतोड केलेल्या वृक्षांचा पंचनामा करण्यात येऊन माहिती मनपा अधिकाºयांना कळविली होती. दरम्यान, याबाबत बुधवारी सकाळी खांदवे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांची भेट घेत झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मनपा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी पांजरापोळ व्यवस्थापक तसेच सुपरवायझर बाळू शिरसाठ यांच्यावर झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोडलेला लाकूडफाटा पळविण्याचा प्रयत्न
काल मंगळवारी पांजरापोळच्या जागेतील बेकायदा वृक्षतोड प्रकरण उघडकीस आले होते. मनपा पथकाने घटनास्थळी धाव घेताच वृक्षतोड करणाºयांनी पलायन केले होते. बुधवारी (दि.३०) सकाळी मनपा पथक पुन्हा पांजरापोळच्या जागेत गेले असता मंगळवारी वृक्षतोड केलेली लाकडे एका ट्रॅक्टरमध्ये भरून पळविण्याचे काम सुरू होते. पथकाला बघताच पुन्हा ट्रॅक्टर व पोकलॅन मशीन सोडून कामगारांनी पलायन केले. दरम्यान, वृक्षतोड करण्यासाठी वापरलेल्या पोकलॅन मशीनला क्र मांक नसल्याने पोकलॅन वाहन संशयास्पद आहे. दुपारी पोलीस पोकलॅन वाहन आणण्यासाठी पांजरापोळच्या जागेत गेले होते.