नाशकात रोख भरणा यंत्र बंद; ग्राहकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 07:26 PM2020-07-26T19:26:32+5:302020-07-26T19:34:11+5:30
कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक व्यावहार मर्यादित असले तरी अनेक जण बँकेत जाण्याऐवजी एटीएम व सीडीएमसारख्या प्रणालीचा वापर करून आर्थिक व्यावहार करतात. परंतु, शहरातील विविध बँकांचे सीडीएम बंद असल्याने रविवारी (दि.२६) ग्राहकांना आर्थिक व्यावहार करताना अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले.
नाशिक : कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक व्यावहार मर्यादित असले तरी अनेक जण बँकेत जाण्याऐवजी एटीएम व सीडीएमसारख्या प्रणालीचा वापर करून आर्थिक व्यावहार करतात. परंतु, शहरातील विविध बँकांचे सीडीएम बंद असल्याने रविवारी (दि.२६) ग्राहकांना आर्थिक व्यावहार करताना अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले.
शहरातील विविध भागातील सीडीएममशीन तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठी करावा लागणारा भरणा करता आला नाही. सध्या महिनाअखेरचा कालावधी असल्याने अनेक नागरिकांकडून इतरांचे देणे व कर्जाचे हप्ते यासरख्या विविध कारणांनी खात्यांवर पैसे जमा करण्याची घाई सुरू आहे. परंतु, रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद असताना सीडीएमही बंद असल्याने ग्राहकांना पैसे हातात असूनही खात्यावर जमा करता आले नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने अशाप्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे सीडीएम बंद असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात आर्थिक पत टिकविण्यासाठी अनेकांनी इतरांकडून उसणवार पैसे घेऊन खात्यावर जमा करण्याचे नियोजन केल आहे. अशा ग्राहकांना सीडीएम बंद असल्याने बँकेतील रांगेत उभे राहून खात्यावर भरणा करावा लागणार असल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
ऑनलाइनवर मदार
सीडीएममधूनही बँकेच्या खात्यावर कोणतेही व्यवहार होऊ शकत नसल्याने ग्राहकांची सर्व मदार आता ऑनलाइन व्यवहारांवर अवलंबून आहे. परंतु, ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी अनेक मर्यादा असल्याने ग्राहकांची गैरसोय होताना दिसून येत आहे. अनेक ग्राहकांना अजूनही ऑनलाईन व्यावहारांविषयी पुरेशी माहिती नाही. तर अनेकजण फसवणुकीच्या भितीने जाणीवपूर्वक ऑनलाईन व्यावहार टाळत असल्याने अशा ग्राहकांची गैरसोय होत असून त्यांना आता थेट बँकेत जाऊन खात्यावर भरणा करण्याची वेळ आली आहे.