घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:45 PM2018-11-25T23:45:21+5:302018-11-26T00:31:13+5:30
बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना पंचवटीतील अभंगनगरमध्ये घडली आहे़
नाशिक : बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना पंचवटीतील अभंगनगरमध्ये घडली आहे़ भालचंद्र अपार्टमेंटमधील रहिवासी नरेंद्र देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार (दि़२१) ते शनिवार (दि़२४) या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ घरातील ३३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके व अर्धा ग्रॅम वजनाची सोन्याची नथ) व २० हजार रुपयांची रोख रक्कम असा ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
व्यवसायाकरिता पैसे आणत नसल्याने विवाहितेचा छळ
पतीच्या व्यवसायासाठी माहेरून पैसे आणत नाही, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या वडिलांच्या दुचाकीची तोडफोड केल्याची फिर्याद पीडित विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली आहे़ कल्पना विलास पाथरे (३४, रा़ तक्षशिला विद्यालयासमोर, देवळालीगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पतीच्या व्यवसायासाठी माहेरून पैसे आणत नाही, या कारणावरून पती दीपक पाथरे, संजय पाथरे (जेठ), जयश्री पाथरे, दिलीप पाथरे (दीर), अनिता आहेर (नणंद), मधुकर आहेर (नंदोई) व भाचा हेमंत तेली (सर्व राहणार गोरेवाडी, मारुती मंदिराजवळ, जेलरोड) यांनी ५ मे २०११ ते २४ नोव्हेंबर २०११ या कालावधित वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला़ तसेच पती दीपक पाथरे याने विवाहितेच्या वडिलांच्या दुचाकीची (एमएच १५, डीएफ ३८९२) तोडफोड केली. तसेच घराच्या काचा फोडून मोठे नुकसान केले़
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विवाहिता छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दारू पिण्यासाठी उद्यानाचे दरवाजा न उघडल्याने मारहाण
दारू पिण्यासाठी उद्यानाचे गेट न उघडल्याने तिघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकरोड मुक्तिधामसमोरील सोमानी उद्यानात घडली आहे़ राजेंद्र पाठक (रा़ इच्छामणीनगर, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उद्यानातील खेळण्यांचा ठेका
असलेल्या इसमाकडे ते कामास असल्याने
उद्यानाचे प्रवेशद्वार उघडणे वा बंद करण्याचे काम ते करतात़
शुक्रवारी (दि़२३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यानाचे गेट बंद केले़ यावेळी तिथे आलेले संशयित निखिल (रा़ भालेराव मळा), हर्षद (रा़ सुभाषरोड) व ओम यांनी दारू पिण्यासाठी उद्यानाचे गेट न उघडल्याच्या कारणावरून या तिघांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली़ यामध्ये पाठक यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे़ या प्रकरणी तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे़