नागरेच्या बँक खात्यात ५५ लाखांची रोकड
By admin | Published: December 29, 2016 12:43 AM2016-12-29T00:43:20+5:302016-12-29T00:43:31+5:30
बनावट नोटा छपाई : अकरा खाती; कोठडीची मुदत आज संपणार
नाशिक : बनावट नोटा छपाई प्रकरणातील प्रमुख संशयित तथा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरेची तब्बल ११ बँक खाती शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. त्यामध्ये ५७ लाख ७२ हजार रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ पोलिसांनी इतर दहा अटक संशयितांच्या बँक खात्यांचीही तपासणी सुरू असून, नोटा छापण्याचे काम करणाऱ्या नागरेच्या साथीदाराचा शोध सुरू आहे़.
दरम्यान, नागरेची बँक खाती सील करण्यात येणार असून या संशयितांना गुरुवारी (दि़ २९) न्यायालयात हजर केले जाणार आहे़
पोलिसांनी अटक केलेल्या छबू नागरेची विश्वास बँकेत नऊ खाती असून स्टेट बँक आॅफ हैदराबाद व स्वत:च्या अॅक्सेस मायक्रो फायनान्समध्ये प्रत्येकी एक अशी अकरा खाती समोर आली आहेत़ यापैकी विश्वास बँकेतील नऊ खात्यांमध्ये ५५ लाख रुपये, तर उर्वरित दोन बँकांपैकी एका बँकेत ९१ हजार तर दुसऱ्या बँकेत १ लाख ६८ हजार असे एकूण ५७ लाख ७२ हजार रुपयांची रोकड आहे़ पोलिसांनी यापैकी तीन बँक खाती सील केली आहेत.
पोलिसांनी २२ डिसेंबरला या अकरा संशयितांना अटक केल्यानतर त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ या कालावधीत पोलिसांनी नागरेच्या आॅसम ब्यूटिपार्लरमधून नोटा छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले़ तसेच बँक खाती शोधण्यात आली़ याबरोबर इतर संशयितांच्या घराची तपासणी व बँक खात्यांचीही चौकशी सुरू आहे़ दरम्यान, या संशयितांची पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी न्यायालयात केली जाणार आहे़ (प्रतिनिधी)
बनावट नोटा छपाई प्रकरण
पुणे येथील आयकर विभागाच्या माहितीनुसार नाशिक पोलिसांनी २२ डिसेंबरला मध्यरात्री संशयित छबू नागरेसह अकरा संशयितांना तीन कारसह अटक केली़ त्यांच्याकडून जुन्या चलनातील १ लाख ८० हजार तर १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या़ राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे हा कमिशनवर जुन्या नोटा बदलून देण्यासाठी बनावट नोटांची छपाई करीत होता़ पोलिसांनी त्याच्या आॅसम ब्यूटिपार्लरमधून स्कॅनर, दोन प्रिंटर, कटर मशीन, शाई, कागद जप्त केले आहे़न्यायालयात उद्या हजर करणारन्यायालयाने छबू दगडू नागरे, रामराव तुकाराम पाटील, रमेश गणपत पांगारकर, संदीप संपतराव सस्ते, ईश्वर मोहन परमार, राकेश सरोज परमार, नीलेश सतीश लायसे, प्रभाकर केवल घरटे, संतोष भीमा गायकवाड, गौतम चंद्रकांत जाधव, प्रवीण संजयराव मांढरे या अकरा संशयितांना गुरुवारपर्यंत (दि़ २९) पोलीस कोठडी सुनावली होती़ त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे़