नाश्त्याला काजू-बदाम आणि बाटलीबंद पाणी!

By admin | Published: November 18, 2016 07:37 AM2016-11-18T07:37:39+5:302016-11-18T07:37:39+5:30

हा अनुभव पाहता, संस्थाचालकांचे आदिवासी विकास विभागाशी कसे साटेलोटे आहे, याचेच प्रदर्शन घडले.

Cashew nut-almond and bottled water for breakfast! | नाश्त्याला काजू-बदाम आणि बाटलीबंद पाणी!

नाश्त्याला काजू-बदाम आणि बाटलीबंद पाणी!

Next


नाशिक : स्वागताला फुलांचा पुष्पगुच्छ, पिण्यासाठी बाटलीबंद पाणी, नाश्त्याला काजू, बदाम पाहून आश्चर्यचकित झालेल्या महिलांच्या पथकाला आश्रमशाळांच्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी आणखी एक धक्का दिला तो म्हणजे पथकाकडे असलेल्या प्रश्नावलीची नक्कल प्रत दाखवून! कळवण तालुक्यातील आश्रमशाळेत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला बुधवारी आलेला हा अनुभव पाहता, संस्थाचालकांचे आदिवासी विकास विभागाशी कसे साटेलोटे आहे, याचेच प्रदर्शन घडले.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी तपास पथके नेमण्यात आली आहेत. हे पथक आले की, आश्रमशाळांमध्ये त्यांच्यासाठी फक्त पायघड्याच घालायच्या बाकी असतात. या आदरातिथ्यामुळे पथकातील काही जणांना मेल्याहून मेल्यासारखे होत आहे... पण ते तरी काय बिचारे, असेच चित्र पांहायला मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील शासकीय व खासगी अनुदानित अशा सुमारे १८० आश्रमशाळांच्या तपासणीसाठी ३० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारपासून त्यांनी तपासणी मोहीम सुरू केली. पथकांनी अचानक आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील वास्तव जाणून घेत, मुलींशी संवाद साधावा व वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे शासनाला अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र आश्रमशाळा संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी या तपासणीपूर्वीच तयारी करून ठेवल्याचे अनुभव आता पथकांना येत आहेत. कळवण तालुक्यातील एका आश्रमशाळेवर पथक धडकताच, तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन पथकप्रमुख व सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर पिण्यासाठी बिसलरीच्या बाटल्याही आणून ठेवल्या होत्या. आश्रमशाळेतील जेवणाचा दर्जा पथकाने तपासू नये, म्हणून पाच वाजता म्हणजे शाळेच्या वेळेतच विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते. पथकाने ज्या प्रश्नावलीच्या आधारे आश्रमशाळांची तपासणी व माहिती संकलित करावयाची होती, त्याची नक्कल प्रत आश्रमशाळा व्यवस्थापनाकडे अगोेदरच उपलब्ध असल्याचा अनुभवही पथकाला आला, त्यामुळे त्यांनी प्रश्नावलीनुसार प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच, त्यांना आगाऊच सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ केल्यागत पटापट देण्यात आली. एवढेच नव्हे तर पथकासमोर विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेचे वास्तव मांडू नये म्हणूनही काळजी घेण्यात आली होती, त्यामुळे विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे पाठ करूनच देत असल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Cashew nut-almond and bottled water for breakfast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.