जातपंचायतीने तरुणाला टाकले जातीबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:24+5:302021-03-07T04:14:24+5:30
नाशिक : राज्य शासनाने जातपंचायतींच्या मनमानीविरोधात सामाजिक बहिष्कार रोधी कायदा बनविला, परंतु जातपंचायतींच्या तक्रारी मात्र कमी होत नाहीत. जातीतून ...
नाशिक : राज्य शासनाने जातपंचायतींच्या मनमानीविरोधात सामाजिक बहिष्कार रोधी कायदा बनविला, परंतु जातपंचायतींच्या तक्रारी मात्र कमी होत नाहीत. जातीतून बहिष्कृत करण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. सिन्नर येथील एका युवकाने दुसऱ्या जातीच्या युवतीशी प्रेमविवाह करण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्याली जातीबाहेर काढण्यात आले आहे. एवढेच नाही तर त्याला त्या समाजातील वाडीतून हाकलून देण्यात आल्याचा दावा अंनिसच्या जातपंचायत मूठमाती अभियानाने केला आहे.
अभियानाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार सिन्नर येथील पीडित युवकाचे अन्य जातीच्या मुलीशी प्रेम जडले. त्याला तिच्यासोबत विवाह करायचा होता. मात्र हा आंतरजातीय विवाह जातपंचायतीस मान्य नसल्याने पंचायतीने विवाहास फक्त विरोधच केला नाही तर मारहाणही केली. तसेच त्याला वाडीबाहेर काढले. सध्या हा युवक त्याची प्रेमिका असलेल्या दुसऱ्या ठिकाणी राहू लागला आहे. या युवकाने तक्रार करण्यासाठी तयारी केली. मात्र जातपंचायतीने त्याच्यावर तक्रार न करण्याचा दबाव आणला व दमदाटीही केली. परिवारानेही जातपंचायतीला घाबरून तक्रार करू नको, अशी भूमिका घेतली असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.
कोट...
सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा होऊनही अशा घटना थांबत नाहीत. त्यामुळे अशा जातपंचांवर गुन्हे दाखल होऊन पीडीत तरुणास सन्मानाचे आयुष्य बहाल झाले पाहिजे.
- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान (अंनिस)
कोट..
अन्य जातीच्या मुलीसोबत विवाह नको म्हणून माझ्यावर दडपण आणले जात आहे. मला जातीतून बाहेर काढून टाकण्यात आले. माझ्या कुटुंबीयांनाही जातीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाशिक येथे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो होतो. तक्रार घेतली नाही. आता सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे.
- पीडित युवक
कोट-
संबंधित व्यक्तीला मारहाण झाल्याची किंवा अन्य कोणतीही तक्रार अद्याप सिन्नर पोलीस ठाण्यात आली नाही.
- संतोष मुठकुळे, पोलीस निरीक्षक, सिन्नर