‘कॅटस्’मधून ४३ लढाऊ वैमानिकांची तुकडीत देशसेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 02:28 PM2019-12-14T14:28:08+5:302019-12-14T14:39:02+5:30
युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षितपणे तत्काळ हलविणे आदी...
नाशिक : भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ वैमानिकांची ३२वी तुकडी शनिवारी (दि.१४) दाखल झाली. नाशिकमधील गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’चा (कॅट्स) दीक्षांत सोहळ्यात ४३ वैमानिकांना आर्मी एव्हिएशनचे अतिरिक्त संचालक मेजर जनरल अजयकुमार सुरी यांच्या हस्ते ‘एव्हिएशन विंग’ प्रदान करण्यात आले.
नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी जवानांना लढाऊ हेलिकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ३२ व्या तुकडीचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्याने या तुकडीमधील ४३ वैमानिकांचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात पार पडला. देशसेवेसाठी विविध ठिकाणी सेवा देण्यास सज्ज झाले आहेत. दरम्यान, सात अधिकाऱ्यांनी लढाऊ हेलिकॉप्टरचालनाच्या प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सुरी यांनी नवप्रशिक्षकांनाही ‘बॅच’ प्रदान करून गौरव केला. यावेळी कॅटस्चे कमान्डंट ब्रिगेडियर सरबजीतसिंग भल्ला उपस्थित होते.
युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षितपणे तत्काळ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ विमानचालनाचे प्रशिक्षण सुमारे वर्षभराच्या कालावधीत या केंद्रातून प्रशिक्षणार्थी जवानांना देण्यात आले.
वैमानिकांच्या तुकडीने ‘कदम-कदम बढाये जा...’ या धूनवर शानदार संचलन करत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. जवानांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. वैमानिकांसह प्रशिक्षकांना ‘एव्हिएशन विंग’ व ‘प्रमाणपत्र’ देण्यात आले.
चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने व चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिकांनी रंगलेला ‘कॅट्स’चा दीक्षांत सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा ठरला. परेडचे विसर्जन बॅन्डपथकाने ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता...’ या गीताची धून वाजवून केले.
सुरक्षित उड्डाणाचे कौशल्य हेच वैमानिकाचे बळ
धाडस व तंत्र कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिकच यशस्वी होऊ शकतो.‘एव्हिएशन स्कूल’च्या उत्तम व्यासपीठावरुन तुम्ही भारतीय सेनेत दाखल झाले आहात त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्यपूर्ण कामगिरीवर भर द्या, असा गुरुमंत्र मेजर जनरल अजयकुमार सुरी यांनी यांनी नववैमानिकांना दिला. सुरक्षित उड्डाणासोबत शारीरिक व मानसिक आरोग्यदेखील उत्तम असणे हे चांगल्या कुशल लढाऊ वैमानिकासाठी गरजेचे असते असेही ते यावेळी म्हणाले.
‘आॅपरेशन विजय’ने अंगावर शहारे
युद्धजन्य परिस्थितीमध्ये भूदलावरील जवानांना महत्त्वाची मदत पोहचविण्याकरिता लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची असलेली भूमिका ‘आॅपरेशन विजय’द्वारे प्रात्याक्षिकांमधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न ‘कॅटस्’कडून करण्यात आला. ‘आॅपरेशन विजय’ची झलक उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारी ठरली. यावेळी चित्ता, चेतक, ध्रूव हेलिकॉप्टरद्वारे सादर करण्यात आलेल्या चित्तथरारक प्रात्याक्षिकांनी उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकविला.
यांचा झाला सन्मान
प्रशिक्षण कालावधीत सर्वच विषयांमध्ये नैपुण्य दाखवि अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल सुरी यांच्या हस्ते कॅप्टन अनुज राजपूत यांना ‘सिल्व्हर चित्ता’ ही मानाचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष प्रावीण्यासाठी मेजर प्रदीप अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिली जाणारी ट्रॉपीचे मानकरी मेजर आदित्य जैन ठरले. उत्कृष्ट उड्डाण कौशल्यासाठी मेजर अंजिष्णुगोस्वामी यांना गौरविण्यात आले तसेच कॅप्टन अंकीत आहुजा हे उत्कृष्ट गनर ठरले त्यांना कॅप्टन पी.के.गौर स्मृतिचिन्ह देण्यात आला. उत्कृष्ट ग्राऊंड सब्जेक्टमध्ये कॅप्टन अमित सिंग यांनी एअर आॅब्झरवेशनमध्ये बाजी मारली.