सप्तशृंगगडावर कावडधारकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:28 PM2017-10-04T23:28:26+5:302017-10-04T23:29:20+5:30
वणी/कळवण : सप्तशृंगी व जगदंबा देवीचा जय घोष करीत कावडधारकांनी मंगळवारी वणीत प्रवेश केला. रात्री उशिरा गडावर पदयात्रा करीत कावडधारक मार्गस्थ होण्याकारिता सज्ज झाले आहेत.
वणी/कळवण : सप्तशृंगी व जगदंबा देवीचा जय घोष करीत कावडधारकांनी मंगळवारी वणीत प्रवेश केला. रात्री उशिरा गडावर पदयात्रा करीत कावडधारक मार्गस्थ होण्याकारिता सज्ज झाले आहेत.
कोजागरी पौर्णिमेला कावडीतून आणलेल्या तीर्थद्वारे सप्तशृंगगडावर देवीला अभिषेक घालण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्या परंपरेस अनुसरून प्रतिवर्षी हजारोंच्या संख्येने विविध राज्यांतील कावडधारक मजल दरमजल करून शेकडो किलोमीटरची पदयात्रा करत तांब्याच्या गडव्यांमध्ये विविध नद्यांचे तीर्थ घेऊन सप्तशृंगीच्या चरणी नतमस्तक होतात. या प्रवासादरम्यान स्वयंसेवी संस्था व सामाजिक उपक्रम राबविणाºया घटकाकडून फराळ-पाण्याची व्यवस्थाही नियोजित असेत. पायात घुंगरू, भगवे वस्र, सुशोभित कावडी व मुखात भगवतीचा जयघोष असा हजारोंच्या संख्येतील कावडधारकांचा लवाजमा भक्तिभावाने कावड यात्रेत सहभागी होऊन निर्भेळ आनंद प्राप्त करतात. मात्र यावेळी प्रतिवर्षीच्या तुलनेत कावडधारकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येते, अशी माहिती टॅक्सीचालक संघटनेचे नाना जाधव व विजय बर्डे यांनी दिली. कारण कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वदिनी नाशिक -वणी रस्त्याचे अंतर प्रवासी वाहनाने कापताना किमान दोन तास कावडधारकांच्या गर्दीमुळे लागत असते. त्या तुलनेत यावर्षी कावडधारकांची संख्या या मार्गावर कमी असल्याचे दिसून आली, अशी माहिती त्यांनी दिली. मनमाड, सिन्नर, चांदवड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, असलोद परिसरातील कावडधारकांनी जगदंबा देवी मंदिरात हजेरी लावली. गुरुवारी पहाटे ५ वाजता कावडधारकांच्या गडव्यातील तीर्थाने भगवतीला अभिषेक करण्यात येणार आहे. जगदंबा मातेचे दर्शन घेऊन प्रस्थानकोजागरी पौर्णिमेला गडावर जाण्यापूर्वी वणीच्या जगदंबेचे दर्शन घेण्याकरिता कावडधारक येतात. मागील वर्षी शहरातील सर्व भागात ठिकठिकाणी कावडधारकांचे जत्थे दिसून येत होते; मात्र सध्या ही संख्या कमी झाल्याचे जाणवत असल्याची माहिती व्यावसायिक मंगेश दायमा यांनी दिली. शेतमालाला भाव नाही, जीवनावश्यक वस्तूंचे गगनाला भिडलेले भाव, त्याचा परिणाम व्यावसायावर झाल्याची माहिती व्यावसायिक सदाशिव चव्हाणके यांनी दिली.