दरच नसल्याने शेतातच सडतोय फ्लॉवर, कोबी, वांगी अन् टोमॅटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 08:25 PM2021-03-01T20:25:43+5:302021-03-02T01:19:29+5:30
येवला / जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणजे कांदा. पण यावर्षी बुरशीजन्य रोगाने व पावसाने शेतकऱ्यांची कांदा रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर, वांगी, टोमॅटो ही पिके घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असून, अनेक शेतकऱ्यांनी पिके शेतातच सोडून दिली आहे. या पिकांतून खर्चदेखील वसूल होत नसल्याने भाजीपाला पाळीव जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

जळगाव नेऊर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे रोपे नसल्यामुळे फ्लॉवर, वांगी, कोबी, टोमॅटो पिकाला पसंती दिली. परंतु त्याचेही उत्पादन जास्त झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनाभाजीपाला कवडीमोल दराने विक्री करावा लागत आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने त्याचा परिणाम भाजीपाला पिकावर होत आहे. बारमाही भाजीपाला उत्पादन घेऊन आपल्या प्रपंचाचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबाचे जीवनमान अस्तव्यस्त झाले. हजारो रुपये भाजीपाल्यासाठी खर्च करून ती वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
कोरोनामुळे आठवडे बाजार बंद होण्याची भीती
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामीण भागातही आठवडे बाजार बंद ठेवण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यावर आधारित भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विक्री कसा करावा, हा प्रश्न उभा राहिला आहे. तोडून ठेवलेल्या भाजीपाल्याला मागणी नसल्यामुळे पाळीव जनावरांना खाऊ घालावा लागत आहे, तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतात सोडून दिला आहे. पर्यायाने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, होत असलेल्या नुकसानीमुळे त्यांच्या प्रपंचाचा गाडा, कसा चालवावा व उधार, उसनवारी करून शेतीसाठी घेतलेला पैसा कसा फेडावा, असा प्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
मी एक एकर क्षेत्रावर फ्लॉवरची दहा हजार काडी लागवड करून साधारणपणे रोपांसह एकरासाठी ३० हजार खर्च केला. गेल्या पंधरा दिवसांपासून फ्लॉवर चालू झाले आहे. त्यातून खर्चदेखील वसूल होत नसल्याने फ्लॉवर शेतातच सोडून देण्याची वेळ आली असून, हजारो रुपये खर्च वाया गेला आहे.
- उत्तम सोनवणे, उत्पादक शेतकरी जऊळके
येवला तालुक्यातील जऊळके येथील शेतकरी उत्तम सोनवणे यांनी शेतातच सोडून दिलेले फ्लॉवर पीक, दुसऱ्या छायाचित्रात जनावरांच्या पुढ्यात टाकलेली वांगी. (०१ जळगाव नेऊर १/२)