गाय-वासराच्या चोरीमुळे पिळकोसला संताप
By Admin | Published: October 21, 2016 12:55 AM2016-10-21T00:55:39+5:302016-10-21T01:05:23+5:30
गाय-वासराच्या चोरीमुळे पिळकोसला संताप
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील शेतकरी बळवंत वाघ या शेतकऱ्याची घराशेजारी बांधलेली गाय व वासरू दोरी कापून चोरून नेल्याने परिसरातील शेतकरी व पशुपालक हे धास्तावले आहेत. परिसरात जनावरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याचे पशुपालकांकडून सांगण्यात येत आहे.
पिळकोस गावाच्या पश्चिमेला राज्य महामार्ग क्रमांक सतरालगत बहुतेक शेतकऱ्यांची खळे आहेत.
या खळ्यात शेतकऱ्यांची
जनावरे बांधलेली असतात. हे शेतकरी वास्तव्यास गावात
राहतात. काल रात्री झालेल्या जनावरांच्या चोरीमुळे शेतकरी धास्तावले आहेत.
आजवर या परिसरात भर दिवसा शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरीला जात होत्या. शेती अवजारे, कृषिपंप, केबल चोरीला गेली आहे. आता रात्रीतून मोठी जनावरे चोरीला
जाऊ लागली आहेत. पोलीस यंत्रणाही याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. या परिसरात सात ते
आठ वर्षांच्या काळात बहुतेक चोरीच्या घटना घडल्या आहेत, परंतु कळवण पोलीस विभागाला एकाही चोरीच्या घटनेचा तपास लागत नसावा का, हा प्रश्न विचारला जात आहे.
कळवण पोलीस प्रशासनाने ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवावी व आजवर या परिसरात ज्या चोरीच्या घटना घडल्या आहेत, त्याचा तपास व्हावा अशी मागणी सचिन वाघ, बाळासाहेब वाघ, ललित वाघ, प्रवीण जाधव, निवृत्ती जाधव, भगवान वाघ, उत्तम बोरसे, देवीदास गांगुर्डे, उत्तम मोरे यांसह पशुपालक, शेतमजूर व ग्रामस्थांनी केली आहे.(वार्ताहर)