आघाडीतील रुसवे-फुगवे पराभवाला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:09 AM2019-05-24T01:09:54+5:302019-05-24T01:10:15+5:30

नरेंद्र मोदींची लाट सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असली तरी, उमेदवार बदलाचा म्हणा किंवा ऐनवेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांचा फटका भाजप उमेदवाराला बसल्याचे चित्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात दिसत आहे.

 Causes of defeat in the front | आघाडीतील रुसवे-फुगवे पराभवाला कारणीभूत

आघाडीतील रुसवे-फुगवे पराभवाला कारणीभूत

Next

नरेंद्र मोदींची लाट सर्वत्र मोठ्या प्रमाणावर असली तरी, उमेदवार बदलाचा म्हणा किंवा ऐनवेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांचा फटका भाजप उमेदवाराला बसल्याचे चित्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात दिसत आहे. यापूर्वी भाजपला २००९ व २०१४ मध्ये नांदगाव विधासभा मतदारसंघातून लाखाच्या आसपास मतांची आघाडी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर यंदा डॉ. भारती पवार यांना मिळालेली मतांची आघाडी भाजपच्या प्रतिष्ठेला शोभणारी नक्कीच नाही. याचवेळी विरोधी मतांची झालेली विभागणी सर्वच विरोधी पक्षांना अंतर्मुख करणारी आहे. प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी झालेल्या शरद पवार यांच्या सभेचा अपवाद वगळता इतर कोणत्याही पक्षाच्या उमेवारासाठी नांदगावी मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही. राजकीय पटलावर नव्याने उदयास आलेल्या बहुजन वंचित आघाडीचा फॅक्टर तालुक्यात आगामी राजकारणासाठी दिशादर्शक ठरणारा आहे. तालुक्यात माकपाच्या मतदारांची संख्या निश्चित आहे. त्यामुळे माकपाच्या उमेदवारीचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मनसेचा प्रभाव अगदी किरकोळ असून, बसपाने दिलेली उमेदवारी केवळ मतांची राष्ट्रीय टक्केवारी वाढावी या उद्देशाने दिसते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्टÑवादीने प्रचारास सुरुवात केली तरी कॉँग्रेस कार्यकर्ते आणि नेते प्रचारात सक्रिय झाले नव्हते. त्यांचा रुसवा-फुगवा घालविण्यातच आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचा वेळ गेला. कॉँग्रेस कार्यकर्ते नंतर सक्रिय झालेही मात्र त्याचा परिणाम दिसून आला नाही. याउलट साडेचार वर्षं राज्यात भाजप-शिवसेना आमने-सामने असल्यामुळे निवडणुकीत युती होते की नाही अशी स्थिती होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ पातळीवर युतीची घोषणा होऊन दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर मनोमीलन मेळावे घेतल्याने भाजपबरोबरच शिवसेनेचे कार्यकर्तेही कंबर कसून कामाला लागल्याने त्याचा फायदा झाला.
या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणाम
लोकसभेच्या महाद्वारातून विधानसभेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी झपाटलेल्या भाजप व शिवसेनेमधील इच्छुकांच्या अस्तित्वाचा घटक म्हणजे ही लढाई होती. लोकसभेत भाजप उमेदवाराचा विजय ही शिवसेनेची अडचण मानली जात आहे. यापूर्वी सेनेचे दोन आमदार झाले असले तरी, मोदींच्या नेतृत्वाखाली असलेला भाजप तिकिटात बाजी मारेल आणि जागावाटपात सेनेचा हक्क डावलला जाईल अशी भीती त्यांना वाटते. परंपरेने ही जागा कॉँग्रेसची आहे. राष्ट्रवादीने ती हिसकावून घेतली याचे शल्य काँगे्रसच्या मनात आहे. जी भीती शिवसेना-भाजप युतीमध्ये आहे तीच भीती कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतही आहे.

Web Title:  Causes of defeat in the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.