शहरात प्रवासी येऊ न देण्याची खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:01 PM2020-05-11T23:01:34+5:302020-05-11T23:25:27+5:30
नाशिक : शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत हजारो परप्रांतीय मजूर गावाकडे निघाले असून, अजूनही मजुरांचे लोंढे रस्त्यांवर दिसून येत आहेत
नाशिक : शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत हजारो परप्रांतीय मजूर गावाकडे निघाले असून, अजूनही मजुरांचे लोंढे रस्त्यांवर दिसून येत आहेत. या परप्रांतीय मजुरांचे जत्थे शहरात येण्यापूर्वीच त्यांना ठाणे, कसारा आणि इगतपुरी येथे रस्त्यावरच थांबवून त्यांच्यासाठी बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. रविवारी सुमारे ८० बसेस सोडण्यात आल्यानंतर सोमवारी (दि.११) देखील १०३ बसेसने परप्रांतीय मजुरांना मध्य प्रदेशातील सीमारेषेपर्यंत सोडण्यात आले.
नाशिक जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यांमध्ये असलेले परप्रांतीय मजूर बेरोजगारीमुळे गावाकडे परतत असून, रस्त्यावर मजुरांचे लोंढे गावाच्या दिशेने निघाल्याचे दिसून येतात. गेल्या आठवड्यापासून हजारो परप्रांतीय गावाच्या दिशेने रवाना झाले आहेत, तर अजूनही मजूर मोठ्या संख्येने पायी प्रवास करताना दिसू येत आहेत. या मजुरांची वाहतूक करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. सोमवारी ठाणे येथूनच प्रवाशांना घेऊन बसेस मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना झाल्या. ठाण्याकडून बरेच लोक पायी निघाल्याचे प्रशासनाला समजल्यानंतर त्यांना पुढे येऊ न देता ठाणे येथूनच गाडीत बसवून पुढे मार्गस्थ करण्यात आले. यासाठी नाशिक येथून ठाण्याला ३६ बसेस पाठविण्यात आल्या होत्या. प्रवाशांना रस्त्यातच थांबवून त्यांच्यासाठी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, शहरातून पायी जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा प्रशाासनाने केला आहे. ठाण्याप्रमाणे शहर, जिल्ह्यातून काही बसेस सोडण्यात आल्या. नाशिक आगार एकमधून १८, आगार २ मधून १३, मनमाड येथून ४, इगतपुरीतून ८, लासलगावातून ९, पिंपळगाव येथून ११ अशा एकुण ६७ बसेस मजुरांना घेऊन मध्य प्रदेशाकडे रवाना झाल्या.
----------
शासनाच्या आदेशाप्रमाणे नाशिकमधून परप्रांतीय मजुरांसाठी बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाच्या आदेशानुसार प्रवासी असलेल्या ठिकाणी तत्काळ बस पाठवून मजुरांना मध्य प्रदेश सीमारेषेवर सोडले जात आहे. गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात मजुरांना मध्य प्रदेशापर्यंत सोडण्यात आले आहे.
- नितीन मैंद, विभाग नियंत्रक